टायटॅनिक 4D

|


कधीतरी कुठेतरी वाचले होते किंवा ऐकले होते, असे म्हणतात की कुठल्याही चित्रपटाला यशस्वी तेव्हाच म्हणायला हवे जेव्हा प्रेक्षक त्या चित्रपटाचे एक डायमेन्शन बनून जाईल. 3D मध्ये नुकताच प्रदर्शित झालेला टायटॅनिक ह्यात अगदी तंतोतंत पास झालेला आहे. ह्या नव्या, भव्य स्वरूपाच्या आणि 3D तंत्रज्ञानात प्रदर्शित झालेल्या टायटॅनिकचे आपण बघता बघता कधी चौथे डायमेन्शन होऊन जातो हे आपल्याला देखील कळत नाही.शितयुद्धात बुडलेल्या आपल्या दोन युद्धनौका शोधण्यासाठी खरेतर अमेरिकेने मोहीम आखली होती आणि तेव्हा योगायोगानेच जलसमाधी मिळालेल्या टायटॅनिकचा शोध लागला असे म्हणतात. चित्रपटात मात्र टायटॅनिकच्या अंतर्भागातील शोधाने चित्रपटाची सुरुवात होते. ब्रॉक लोव्हेट आणि त्याच्या टीमचा शोध चालू असतो एक अत्यंत मौल्यवान अशा रत्नहाराच्या शोधासाठी. 'हार्ट ऑफ द ओशन' असे सुंदर नाव असलेल्या त्या हाराचा शोध घेताना त्यांना रत्नहाराच्या मालकाची म्हणजेच 'कॅल हॉकली' ची तिजोरी सापडते. मोठ्या उत्साहाने ते तिजोरी बाहेर काढून फोडतात, मात्र तिजोरीत हाराच्या ऐवजी काही नोटा, खराब झालेली कागदपत्रे आणि एका नग्न स्त्री चे स्केच येवढेच सापडते. ह्या शोधाची बातमी टीव्हीवरती ऐकून रोझ डॉसन नावाची एक १०० पार करत असलेली वृद्धा ते स्केच आपलेच असल्याचा दावा करते. थोडी शंका, बरीचशी उत्सुकता अशा वातावरणात तिला शोधस्थळी आणले जाते, आणि तिने सांगितलेल्या एका जहाजाच्या अद्भुत कहाणीने चित्रपटाची खरी सुरुवात होते.

खर्‍या आणि खोट्या कथांच्या अद्भुत मिश्रणाने दिग्दर्शक जेम्स कॅमरुन ने ह्या चित्रपटाची वीण गुंफलेली आहे. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून तो आपल्याला त्यात गुंतवून ठेवतो. आणि आता 3D तंत्रज्ञानाने तर आपण त्या भव्य बोटीवरचेच एक प्रवासी बनून जातो. 'कधीही न बुडण्याचे सामर्थ्य लाभलेले पाण्यावरती तरंगते एक अद्भुत स्वप्न' असेच खरेतर ह्या भव्य दिव्य टायटॅनिक बोटीचे वर्णन करायला हवे. अमेरिकेच्या दिशेने निघालेल्या ह्या बोटीवरती रोझ (केट विन्स्लेट) ही आपली आई 'रुथ' आणि भावी अब्जाधीश नवरा 'काल' ह्यांच्या बरोबर प्रवास करत असते. रोझ आजूबाजूच्या चकचकीत आणि खोट्या दुनियेला उबलेली तर तिची आई काही करून रोझचे लवकरात लवकर लग्न व्हावे आणि आपल्यावरील कर्जे लवकर फिटावीत ह्या चिंतेत असलेली. तर प्रत्येक गोष्ट पैशात मोजणारा माजोरी कॅल त्याच्या एका वेगळ्याच दुनियेत वावरणारा. ह्याच बोटीत थर्डक्लास मधून प्रवास करत असतो तो जॅक डॉसन (लिओनार्डो डी कॅप्रिओ) हा एक धडपड्या चित्रकार. वेगवेगळे देश हिंडत चित्रकलेचा आनंद लुटणे आणि मनमौजी जगणे हा त्याचा स्वभाव. अशा विविध स्तरांच्या आणि मनोवृत्तीच्या लोकांना घेऊन टायटॅनिकचा आणि आपला प्रवास सुरू होतो.

ह्या दिखाव्याच्या आणि कसलेच निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या आयुष्याला कंटाळलेली रोझ एके रात्री बोटीवरून जीव द्यायला निघते. मात्र तिथेच असलेला जॅक तिची समजूत घालून तिला वाचवतो. तिथे जमलेल्या लोकांना आणि 'कॅल' ला रोझ आपण तोल जाऊन पडणार होतो, मात्र जॅकने आपल्याला वाचवले असे खोटेच सांगते. इथेच रोझची आणि जॅकची मैत्री जमते. अर्थात अशा खालच्या दर्जाचा माणसाशी तिची मैत्री तिच्या आईला आणि होणार्‍या नवर्‍याला पसंत नसणे हे ओघानेच आले. जॅकच्या संगतीत रोझला एका वेगळ्याच विलक्षण आयुष्याची आणि जगाची ओळख होते. एकाच बोटीवरच्या ह्या आयुष्याच्या वेगवेगळ्या रंगांना पाहून ती थक्क होते. हळूहळू दोघेही एकमेकांकडे आकर्षीत व्हायला लागतात. रोझची आई आणि नवरा ह्यातला धोका वेळीच ओळखून दोघांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी सर्व तर्‍हेचे प्रयत्न करायला सज्ज होतात.
एके रात्री जॅकने काही मॉडेल्सची ज्या प्रमाणे नग्न स्केचेस काढली आहेत तसेच एक स्केच आपले देखील काढावे अशी इच्छा रोझ व्यक्त करते आणि जॅक तसे स्केच काढतो देखील भावी नवर्‍याने दिलेला अमूल्य असा 'हार्ट ऑफ द ओशन' फक्त अंगावरती ठेवून रोझ मॉडेल म्हणून हजर होते. स्केच पूर्ण होत असतानाच त्यांच्या शोधात असलेला 'काल' चा नोकर त्यांच्या पर्यंत पोचतो आणि त्यांना तेथून पळ काढावा लागतो. मात्र जायच्या आधी रोझ तो नेकलेस आणि आपले स्केच 'काल'च्या तिजोरीत ठेवून त्याला गुडबाय करायला विसरत नाही. आता बोटीवरती रोझ आणि जॅकसाठी शोधमोहीम सुरू होते. रोझ आणि जॅक मात्र गोडाउनच्या अंधारात एकमेकांच्यात जगाला विसरून गेलेले असतात. मात्र बोटीचे लोक त्यांना शोधत तिथे देखील पोचतात. आरा दोघेही तिथून पळ काढून डेकवरती धावतात, आणि त्याचवेळी रात्रीच्या सुमारास टायटॅनिक नावाच्या ह्या भव्य स्वप्नाला एका हिमनगाची धडक बसते. ही धडक येवढी वेगवान असते की बोटीच्या बेसमेंटला प्रचंड नुकसान होऊन बोटीत वेगाने पाणी शिरण्यास सुरुवात होते.ह्या प्रसंगाचे साक्षीदार असलेले आणि पुढे येणार्‍या संभाव्य धोक्याची जाण असलेले रोझ आणि जॅक, रोझच्या आईला आणि कॅलला सावध करण्यासाठी त्यांच्या खोलीकडे धावतात. पिसाळलेला कॅल मात्र जॅकला खोट्या चोरीच्या केसमध्ये अडकवतो आणि सुरक्षारक्षकांच्या हवाली करतो. इकडे बोटीची अवस्था क्षणा क्षणाला बिघडत चाललेली असते. जास्तीत जास्त अजून दोन तास बोट तग धरेल ह्याचा अंदाज आणि मदत मिळू शकेल अशी दुसरी बोट टायटॅनिकजवळ पोचायला कमीत कमी चार तास अशी परिस्थिती निर्माण होते आणि एका प्रेमकहाणी मागे पडून मानवी भावभावनांची आणि जीवन-मृत्यूच्या खेळाची एक वेगळीच कहाणी आकार घ्यायला सुरुवात होते. जास्तीत जास्त निम्मेच प्रवासी वाहून नेता येतील येवढ्याच लाइफबोट्स टायटॅनिकवरती असल्याने अजून एक वेगळाच कठीण प्रश्न समोर येतो. अशावेळी मुले आणि स्त्रिया ह्यांना प्राधान्य देण्यात येते. मात्र ह्या गडबडीत रोझ सगळे काही सोडून जॅकला वाचवण्यासाठी धाव घेते. ती जॅकला वाचवू शकते ?, ते दोघे ह्या संकटातून बाहेर पडतात का?, टायटॅनिक नावाचे स्वप्न कुठले वळण घेते हे सगळे अनुभवायचे असेल तर टायटॅनिकचा प्रवास करण्यावाचून पर्याय नाही.हतप्रभ होऊन स्वतःलाच गोळी मारून घेणारा चीफ ऑफिसर, शेवटच्या क्षणापर्यंत लोकांचे धैर्य टिकवून ठेवण्यासाठी सज्ज असलेला वाद्यवृंद, निराश आणि खचलेल्या मनाने मृत्यूला सामोरा जाणारा कॅप्टन, स्वप्नभंगाच्या दु:खात मृत्यूची वाट बघत थांबलेला बोटीचा डिझायनर असे एक ना अनेक लोक आपल्याला इथे भेटतात आणि जीवनाचे वेगळेच दर्शन घडवून जातात. टायटॅनिक मधले अनेक प्रसंग आपल्या काळजावरती कोरले जातात. स्वतःचा जीव धोक्यात असताना एका लहान मुलाला वाचवायला धावणारे जॅक आणि रोझ एका बाजूला तर लाईफ बोटीत जागा मिळावी म्हणून गर्दीत चुकलेल्या मुलीला आपलीच मुलगी सांगून जागा मिळवणारा कॅल एका बाजूला. बायकांना लाईफ बोटीत बसवता बसवता स्वतःच हळूच त्या बोटीत उडी मारून बसणारा मॅनेजींग डायरेक्टर जोसेफ एका बाजूला आणि पाणी कंबरेपर्यंत आलेले असताना लोकांना लाईफ जॅकेट्स वाटत फिरणारे पोर्टर एका बाजूला.हे आणि असे बरेच प्रसंग आपल्याला हालवून सोडतात. ह्या अशा वेगळ्या अनुभवांसाठी का होईना पण टायटॅनिक पाहणे मस्टच.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा