Acacia

|


हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये कोरिअन चित्रपट हे कायमच स्वतःचा असा एक वेगळा दर्जा टिकवून राहिलेले आहेत. ह्या चित्रपटांच्या यादीतलाच एक अप्रतिम चित्रपट म्हणजे अकॅशिआ. अकॅशिआ म्हणजे छोटी छोटी पिवळी फुले येणारा एक वृक्ष.डॉक्टर किम आणि त्यांची पत्नी मी-सूक हे विनापत्य दांपत्य. आपल्या वडिलांच्या मदतीने शेवटी एकदा डॉक्टर किम आपल्या पत्नीला मूल दत्तक घेण्यासाठी राजी करतो आणि ह्या चित्रपटाला सुरुवात होते. कलेची आवड असणारी मी-सूक जिन्साँग ह्या सतत चित्रे काढण्याची आवड असणार्‍या अनाथ मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेते. जिन्साँगच्या घरी येण्याने ह्या कुटुंबाच्या एका नव्याच आयुष्याला सुरुवात होते.अतिशय अबोल आणि सतत झाडांचीच चित्रे काढण्यात मग्न असणारा जिन्सॉंग आपल्या सभोवताली कायमच एक गूढ वलय बाळगून असतो. काही दिवसातच जिन्साँग समोरच्या घरात राहणार्‍या मिन्जी ह्या लहान मुलीकडे आणि त्याच्या घराच्या बागेत असलेल्या एका वठलेल्या अ‍ॅकेशिआ वृक्षाकडे आकर्षित होतो. ते झाड म्हणजे आपली मेलेली आई असल्याचे जिन्सॉंगचे ठाम मत असते. मिन्जीच्या संगतीत काहीसा अबोल असणारा जिन्साँग थोडाफार बोलका तर बनतोच पण काहीसा दुराग्रही आणि हट्टी देखील बनायला लागतो. त्यातच मी-सूक ला दिवस जातात आणि सगळे चित्रच बदलते.आपली आई आता नव्या बाळाची आई होणार ह्या कल्पनेने आधीच हट्टी असलेला जिन्साँग फारच दुराग्रही बनून जातो. त्यातच मुलीच्या प्रेग्नन्सीची बातमी ऐकून हजर झालेली मी-सूक ची आई तिला जिन्साँगला परत अनाथाश्रमात पाठवायचा सल्ला देते. मी-सूक मात्र त्याला तयार होत नाही. बाळाच्या जन्मानंतर मात्र जिन्साँगचे वागणे एकदमच खुनशी होऊन जाते आणि सगळे कुटुंबच दचकते. जिन्साँगला सतत समजून घेण्याचा प्रयत्न करणारी मी-सूक देखील आता त्याच्याशी प्रेमाने वागेनाशी होते. अशा काजळलेल्या वातावरणात एका पावसाळी रात्री जिन्साँग अचानक नाहीसा होतो आणि संपूर्ण कथेला एक वेगळेच वळण लागते.जिन्साँगच्या जाण्याने एकटी पटलेली छोटी मिन्जी आता सतत आपला वेळ त्या वठलेल्या अकॅशिआ वृक्षाच्या सानिध्यातच घालवायला लागते. त्या झाडातून जिन्साँग तिच्याशी बोलतो असे ती सांगायला लागते आणि सगळे दचकतात. त्यातच अचानक जिन्साँग नाहीसा झाल्याच्या दुसर्‍या दिवसापासून त्या वठलेल्या वृक्षाला पालवी फुटायला सुरुवात होते. काही दिवसातच तो वृक्ष चांगलाच बहरतो आणि एकेदिवशी त्या वृक्षाकडून त्याच्या परिघात येणार्‍या जिन्साँगच्या दत्तक कुटुंबावर फांद्या आणि मुंग्यांच्या साहाय्याने जीवघेणे हल्ले सुरू होतात. ह्या अचानक घडू लागलेल्या अनैसर्गिक घटनांनी संपूर्ण कुटुंबच थरारून उठते. आणि मग एक दिवशी अचानक सगळ्या रहस्यावरचा पडदा उघडतो आणि आपण प्रेक्षक सुन्न होऊन जातो.जिन्साँगच्या बाबतीत नेमके काय घडलेले असते ? तो परत येतो ? अ‍कॅशिआ आणि जिन्साँगचे नक्की नाते काय असते ? मिन्जी जे सांगत असते ते खरे असते का ? ह्या अशा रहस्यमयी प्रश्नांनी सोडवणूक आणि तो सुटतानाचा थरार पडद्यावर बघण्यातच खरी मजा आहे. चित्रपट कोरिअन असला तरी इंग्रजी सबटायटल्स सकट तो उपलब्ध असल्याने निराशा होण्याचे कारण नाही. कुठेही रक्तपात, माणसे कापाकापीची दृश्ये, ओंगळावाणी भुते, विचित्र आणि कर्कश संगीत ह्याची जोड न घेता देखील तुम्हाला रहस्यमयी वातावरणात कसे खिळवून ठेवले जाते ह्याचा अनुभव घेण्यासाठी तरी हा चित्रपट पाहायलाच हवा. अनेक दृश्यात संवाद कमी आणि कॅमेर्‍याचा वापर जास्ती करून दिग्दर्शक आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवतो. दिग्दर्शन, कथा आणि अभिनय सर्वच अंगाने सुरेख असलेला हा चित्रपट पाहायलाच हवा.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा