शटर

|
1

मध्ये सपाट्याने काही हॉरर चित्रपट बघितले होते. त्यातील 'अ टेल ऑफ टू सिस्टर्स' आणि 'अ‍ॅकेशिआ' ची ओळख ह्या आधी करून दिलीच आहे. ह्याच यादीतला आणखी एक चित्रपट म्हणजे 'शटर'. 'अ टेल ऑफ टू सिस्टर्स' आणि 'अ‍ॅकेशिआ' हे काहीसे गडद गडद अंधारात घडणारे , मानसिक आंदोलने दाखवणारे चित्रपट होते, मात्र शटर ह्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आणि सतत तुमच्या मनावर एक दडपण ठेवून असणारा चित्रपट. ह्या चित्रपटात देखील रक्तपात, हिडीस चेहरे ह्याचा समावेश नाही, मात्र चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम आपल्याला खिळवून ठेवते.टन हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर असतो. तो आणि त्याची गर्लफ्रेंड जेन एकदा पार्टीवरून परत येत असताना, जेनच्या हातून एक अपघात घडतो. ती आपल्या गाडीने एका तरुण मुलीला उडवते. गाडीबाहेर जाऊन तिला मदत करण्याच्या विचारात असलेल्या जेनला टन थांबवतो आणि त्या तरुणीला तसेच रस्त्यात सोडून दोघे निघून जातात. इथून खर्‍या अर्थाने चित्रपटाला सुरुवात होते.

2

ह्या प्रसंगानंतर एकाएकी अनेक चमत्कारिक घटना घडू लागतात. सतत आपल्या भोवती कोणीतरी वावरत आहे असे दोघांना वाटत असते. त्यातच टनने काढलेल्या प्रत्येक फोटो मध्ये एक धुरकट आकृती दिसायला लागते. कधी धुरकट सावलीच्या रूपात, तर कधी चेहर्‍याचा रूपात. प्रथमतः टनला हा कॅमेर्‍याचा प्रॉब्लेम वाटतो, मात्र तसे काहीच निष्पन्न होत नाही. इकडे जेन मात्र आपण ज्या मुलीला उडवले त्या मुलीचा आत्माच हे सगळे करत आहे ह्या निष्कर्षावर पोहोचते. टनला मात्र हे सगळे अमान्य असते.

3

टनच्या मित्रांना देखील आता विचित्र अनुभव यायला लागतात. टनला देखील अचानक मानदुखीचा त्रास सुरू झालेला असतो, त्याचे वजनकाटा देखील त्याचे वजन विचित्र दाखवायला लागलेला असतो. शेवटी जेन त्या अपघातग्रस्त तरुणीचा शोध सुरू करते. तपासात जेनला त्या मुलीचे नाव नात्रे असल्याचे आणि ती आणि टन व त्याच्या मित्रांचा ग्रुप कधीकाळी एकाच कॉलेजात शिकत असल्याचे समोर येते. आता मात्र टनला सत्य सांगण्याशिवाय पर्याय उरत नाही. कधी काळी त्याचे आणि नात्रेचे प्रेमसंबंध होते, मात्र त्याने नाते तोडल्यावर ते दु:ख सहन न होऊन नात्रेने आत्महत्या केल्याचे टन कबूल करतो. इकडे टनचा एक मित्र नात्रेच्या आत्म्याच्या भितीने आत्महत्या करतो. आता पुढचा नंबर आपलाच असल्याची त्याची खात्री पटते.

ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायच्या इराद्यानेच आता जेन आणि टन दोघेही नात्रेच्या आईला जाऊन भेटता. तिथे गेल्यावर नात्रेने कशी आत्महत्या केली हे त्यांना कळते, मात्र नात्रेची आई तिचा मृत्यू मान्य करायलाच तयार नसते. तिने आपल्या मुलीचे प्रेत अर्थात सांगाडा तिच्या बेडरूम मध्ये जतन करून ठेवलेला असतो. त्याच रात्री हॉटेलात उतरलेल्या टन आणी जेनवरती नत्रेचा आत्मा हल्ला करतो, ज्यात टन जखमी होतो. अथक प्रयत्नांनी दोघेही तिच्या आईला समजवतात आणि शेवटी नात्रेची विधिपूर्वक विल्हेवाट लावली जाते.

4

आता सर्व काही सुरळीत होईल ह्या आशेनं परतलेल्या जेनला काही फोटो मिळतात, जे नात्रेचे टनच्या फ्लॅट मधील अस्तित्व दाखवत असतात. फोटोंचा माग घेत असतानाच एका जेनच्या हातात एका बुकशेल्फ मध्ये लपवलेल्या काही जुन्या निगेटिव्ह्ज लागतात. त्या डेव्हलप केल्यानंतर एक भयानक रहस्यच जेनच्या समोर येते आणि चित्रपटाला वेगळेच वळण लागते. हे रहस्य काय असते ? टन आणि त्याच्या मित्रांच्या जीवावर नात्रेचा आत्मा का उठलेला असतो ? हे सगळे शोधायचे तर शटर पाहण्याशिवाय पर्याय नाही. आणि हो हे सर्व सोडाच पण 'टनला नक्की मानदुखीचा त्रास कशाने होत असतो' ह्या एकमेव प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी तरी शटर पाहाच पहा.

5

शटरचा त्याच नावाने २००८ साली अमेरिकन रीमेक देखील आलेला आहे, तर हिंदीत तो क्लिक नावाने आला होता. मी तरी तुम्हाला 'ओरिगिनल' शटरच बघण्याचा सल्ला देईन. अर्थात जालावर त्याचे सबटायटल्स सहजपणे उपलब्ध आहेतच. एका वेगळ्या प्रकारचा हॉरर चित्रपट बघायची इच्छा असेल आणि मिनिटा मिनिटाला नवनवे धक्के बसणे आवडत असेल तर शटरला पर्याय नाही.

हा संपूर्ण चित्रपट आंतरजालावर फुकट उपलब्ध आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा