फुल्ल टू दबंग

|
काल मध्यान्ह मुहूर्तावर मी छानसे देवाला आणि स्वतःला वंदन केले. त्यानंतर 'हे कसे शक्य आहे? ' 'असे कधी असते का? ' असे नको ते प्रश्न विचारणारा मेंदूचा भाग काढून बाजूला ठेवाल. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो. अशी छानशी पूर्वतयारी झाल्यानंतर मी दबंग बघायला सज्ज झालो हे तुम्ही ओळखले असेलच.नुकताच येऊन गेलेला सलमान 'वाँटेड' पाहिल्यापासून सलमान आणि दबंग दोघांनी माझ्या अपेक्षा फारच उंचावून ठेवल्या होत्या. तसा मी काही फार जाणकार परीक्षक किंवा एखाद्या कलाकाराला पारखू शकेन असा कसबी वगैरे नाही, पण सलमानचा वाँटेड पाहिल्यापासून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे सलमानने आता स्वतःला आणि स्वतःच्या वकुबाला पूर्ण ओळखले आहे. मुख्य म्हणजे सलमान काय करू शकतो आणि तो काय करताना हिट होऊ शकतो हे कळणारे कसबी दिग्दर्शक त्याच्या हाताला लागू लागले आहेत. अरे वाटत आहे की सलमानने आता आपण कितपत अभिनय करू शकतो हे व्यवस्थित लक्षात घेऊन त्या टाईपच्या भूमिका करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सलमानला बघणे आणि सहन करणे आता सुसह्य व्हायला लागले आहे. अभिनय, मेलोड्रामा, डोळ्यांची भाषा वगैरे आपल्याकडून पब्लिकला अपेक्षीत नाही आणि ते आपल्याला जमणार नाही हे त्याच्या पक्के लक्षात आले आहे, त्यामुळे ओन्ली रफ अँड टफ अका रावडी सलमान दबंग पूर्ण खाऊन जातो आणि मुख्य म्हणजे डोक्यात न जाता डोक्यावर जातो.दबंग म्हणजे निर्भय. हि गोष्ट आहे उत्तरप्रदेश मधल्या लालगंज भागातील एका निर्भय पण चालू पोलिस ऑफिसर रॉबिनहूड उर्फ चुलबुल पांडेची. कंजूष सावत्र वडील विनोदखन्ना आणि आई डिंपल कपाडिया ह्यांच्या सोबतच त्याला साथ आहे ती सावत्र भाऊ मख्खी उर्फ मंदबुद्धी आरबाज खानची. लहानपणापासूनच वडील आणि सावत्र भावाशी चुलबुल उर्फ सलमानचे सख्य असे नसतेच. त्यांना जाता येता त्रास देणे, ताठपणे बोलणे हेच काय ते त्याचे काम. हा लहान चुलबुल आता एक धाडसी पोलिस ऑफिसर बनलेला आहे जो लुटारूंना वगैरे पकडून वर त्यांचा माल लुटून त्यांना पळून जायला देखील मदत करत असतो.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच सलमानच्या एंट्रीचा जो शॉट आहे तिथेच माझ्या मनात थोडीशी शंकेची पाल चुकचुकायला लागली होती. हि सलमानची एंट्री अगदी थेट 'वाँटेड' चित्रपटाप्रमाणेच आहे. अगदी तो त्या सिनेमात ज्या गोडाउन मध्ये मारामारी करतो तसेच हुबेहूब गोडाउन इथे दबंग मध्ये उभे केल्यासारखे स्पष्ट जाणवते. एंट्रीचा शॉट संपल्या संपल्या लगेच 'दबंग दबंग' हे गाणे सुरू होते. गाणे आणि संगीत थेट 'ओंकारा' च्या वळणावर जाणारे. आता भवतेक चित्रपट बघून डोक्याला शॉट लागणार असे वाटायला लागते... मात्र नंतर जी काही धमाल सुरू होते की क्या कहने...

दबंग सलमानची झडप आता लालगंजचा युवा नेता छेदी सिंग बरोबर होते. छेदी सिंगचा रोल सोनू सूद ने केला आहे. अप्रतिम शरीरयष्टी आणि सहज अभिनय ह्यामुळे ह्या भूमिकेत तो भाव खाऊन गेला आहे हे नक्की. ह्या छेदी सिंगच्या डोक्यावर हात आहे तो मंत्री अनुपम खेरचा आणि त्याला सोबत आहे ती होणाऱ्या इन्स्पेक्टर सासऱ्याची ओम पुरीची. लूटमार, देशी दारूच्या भट्ट्या हे सगळे सांभाळून राजकारण करणे आणि आगामी निवडणुकीसाठी तिकिटाच्या मागे लागणे हे ह्या छेदी सिंगचे काम. त्याच्या माणसाने लुटलेला माल त्याच्या माणसांकडून सलमान पळवतो आणि इथे त्यांच्या संघर्षाला सुरुवात होते. पुढे अनुपम खेर देखील सलमानच्या मदतीने छेदी सिंगला शह देऊ पाहतो आणि हे युद्ध अजूनच भडकते.मधल्या वेळात सलमानची हिरवणी म्हणून सोनाक्षी सिंगची नेमणूक केलेली आहे. तसेही आजकाल हिरवणींकडून फारशी अभिनयाची अपेक्षा नसतेच. सोनाक्षी दिसली आहे सुंदरच आणि 'थप्पडसे नही प्यारसे डर लगता है साब' वगैरे डायलॉग मारत काही संवादात भाव देखील खाऊन गेली आहे. एकूणच सोनाक्षीचे पदार्पण झक्कास म्हणायला हरकत नाही. तिच्या जोडीलाच उल्लेख करायला हवा तो आरबाज खानचा. ह्या माणूस देखील फारसा अभिनय कुशल वगैरे नाही, पण मर्यादेत राहिला तर छान काम करून जातो. (उदा. गर्व) ह्या चित्रपटात देखील त्याच्या वाटेचे काम त्याने चोख केले आहे. स्वतः दिग्दर्शक असूनही तो कुठे भरकटलेला नाही आणि मुख्य म्हणजे त्याने सलमानला देखील भरकटू दिलेले नाही.सलमान आणि आरबाजच ह्या चित्रपटातील मिशीवाला लुक एकदम शॉल्लेट आणि त्यांना शोभतोही. हा लुक म्हणे सलमानला सोनाक्षीनी सुचवला. खरेतर ह्या चित्रपटात खान कँप कडून गोविंदाच्या कन्येला लाँच केले जाणार असल्याची बातमी होती, पण ऐनवेळी बाजी मारली ती शत्रुघ्न सिन्हांची कन्या सोनाक्षीने. जाडजूड सोनाक्षील ६ महिने जीम मध्ये राबवून सलमानने अगदी फिट केल्याचे दिसते.हान.. तर आता इकडे चुलबुल आणि सलमान मधला संघर्ष चांगलाच पेट घेतो तर तिकडे दुसऱ्या आघाडीवर आईच्या मृत्यूनंतर सलमान आणि त्याच्या वडील आणि भावातला संघर्ष देखील पेटून उठतो. सलमानच्या वडील आणि भावाची मदत घेऊन छेदी सिंह सलमानला शह देऊ पाहतो मात्र त्यात अयशस्वी ठरल्याने तो त्यांच्या फॅक्टरीला आग लावून देतो. त्या धक्क्याने सलमानचे वडील हॉस्पिटलामध्ये ऍडमिट होतात. वडिलांच्या इलाजासाठी पैशाची गरज असलेला आरबाज पुन्हा छेदी सिंहच्या जाळ्यात सापडतो आणि नको ती कामे करायला लागतो. शेवटी भावाचाच खून करायची गळ त्याला छेदी सिंह घालतो तेव्हा मात्र तो जाऊन सलमानला मिळतो आणि मग दुष्टांचा नाश ठरलेलाच.


अशा साध्या सरळ आणि टिपीकल रावडी कथेला उत्तम साथ लाभली आहे ति संगीताची आणि ऍक्शन दृश्यांची. संगीताच्या आघाडीवर साजिद-वाजिद ह्यांनी खरोखर श्रवणीय आणि अप्रतिम कामगिरी केलेली आहे. चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर आहेत. उडत्या चालीच्या (आणि ढापलेल्या) 'मुन्नी बदनाम हुई' बरोबरच 'तेरे मस्त मस्त दो नैन' हे राहत फतेह अली खानच्या आवाजातील हळुवार गाणे म्हणजे मेजवानी आहे.

Get this widget | Track details | eSnips Social DNA

एस. विजयन ह्यांची ऍक्शन दृश्ये भन्नाटच आणि टिपीकल सलमान खान फॅन्सची मागणी पूर्ण करणारी. त्याच्या जोडीला खटकेबाज संवादाची चटपटीत भेळ आहेच. मात्र हे सगळे असताना देखील विनोद खन्ना, अनुपम खेर आणि ओम पुरी सारख्या कलाकारांना इतक्या किरकोळ भूमिका देऊन वाया का घालवले अशी रुखरुख राहून जाते. कदाचित 'खान कँप'ला नाही म्हणणे जड गेले असल्याने त्यांनी ह्या भूमिका स्वीकारल्या असाव्यात. तुलनेने तेवढ्याच छोट्या भूमिका असून देखील महेश मांजरेकर आणि डिंपल मात्र आपल्या अभिनयाची छाप सोडून जातात.

जाताजाता अरबाजच्या दिग्दर्शनाला सलाम ठोकावेसे वाटतात असे २ प्रसंग :-

१) मंत्री असलेल्या अनुपम खेरच्या बंगल्यात येवढ्या सिक्युरिटी मधून अरबाज आरामात आंब्याच्य पेटीतून बाँब घेउन जातो.


२) अंतिम मारामारीत सलमानच्या अंगावरुन टराटरा फाटून चिंध्या होउन वार्‍यावर उडालेला शर्ट सलमान खलनायकाला मारुन ट्रॅक्टरमधून परत येताना तोच शर्ट त्याच्या अंगावर असतो.

एकूण काय तर दबंग सलमानसाठी, झटकेबाज सोनाक्षीसाठी आणि 'तेरे मस्त मस्त दो नैन' साठी हा १००% टैमपास करणार दबंग बघणे मस्टच आहे.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा