रेडी ? नो रेडी ssSSsss ...

|


वाँटेड आणि दबंगच्या मसाला धमाक्यानंतर सलमानकडून रेडी मध्ये देखील थोड्याफार तशाच धुमाकुळाची अपेक्षा होती. (इथे 'अपेक्षा उंचावली होती' असे म्हणालेले नाही ह्याची नोंद घेतल्या जावी.) अगदी फुल्ल्टू धमाल नसेल पण निदान दोन अडीच तास जो काय चित्रपटाचा कालावधी असेल तो झकास जाईल ह्या कल्पनेने रेडीला हजेरी लावली.सलमान, असीन, परेश रावल, पुनीत इस्सर, मनोज जोशी हे शिलेदार, महेश मांजरेकर, आर्य बब्बर, अनुराधा पटेल हे सैनिक आणि पाहुण्या भूमिकेत संजु बाबा, चंकी पांडे, आरबाज खान, अजय देवगण आणि झरीन खान अशी फौज असताना मस्त झणझणीत भेळेचा बकाणा भरायला मिळणार ह्या आशेने आम्ही स्थानापन्न झालो. खरंच सांगतो तुम्हाला चित्रपट सुरु झाल्यापासून १५ व्या मिनिटाला आम्ही 'चित्रपटालाच नाही तर पृथ्वीवरच का आलो ?' असा प्रश्न स्वतःला विचाराण्यायेवढे निराश आणि हताश झालो.

खरेतर परीक्षण आणि परिचयात चित्रपटात काय काय आहे हे रंगवून सांगायचे असते; पण इथे आमची झोळी रिकामीच असल्याने काय सांगायचे हा प्रश्नच आहे. आता चित्रपटात काय बघितले असे विचाराल तरी आठवून आठवून लिहावे लागेल. सांगायचे कशाबद्दल ? कथा = भिकार, म्हणजे खरेतर १०/१२ सुप्पर डूप्पर चित्रपटांच्या शॉट्सची मिळून विणलेली गोधडी. पटकथा = कथाच नाही हो., पटकथेचे काय डोंबल घेऊन बसलायत ? अभिनय = शंख ! अक्षरशः सगळ्या कलाकारांना वाया घालवले आहे. आणि सलमान तर असह्यच होतो. देव आनंद.. अगदी गेला बाजार मनोज कुमार देखील स्वतःचा चित्रपटात स्वतःवर येवढा वेळ कॅमेरा ठेवत नसतील येवढा चित्रपटभर सलमानवर केंद्रित आहे. (मनोजकुमार हा गेला बाजारच आहे आणि देव आनंद अजूनही तरुण आहे हे ध्यानात घ्यावे.)

बरं आता तुम्हाला स्टोरी सांगायची म्हणली तर ती चार ओळीत देखील मावायची बोंबाबोंब. सलमान एक 'मासूम चेहरेवाला कमींना' असतो आणि त्याचा बाप महेश मांजरेकर हा करोडपती असतो आणि विनाकारण विनोद निर्मितीसाठी तो विसराळू देखील असतो. तो नक्की काय धंदा करत असतो हा भाग अलाहिदा. तर ह्या सलमानचा एक भरापुरा परिवार असतो. २ काका , २ काकवा, २ नोकराणी, एक कुत्री इ. इ. कुटुंबाचे एक गुरुजी देखील असतात, ज्यांच्या सल्ल्यानेच घरातली काडी इकडची तिकडे हालत असते. हे गुरुजी सलमान अर्थात प्रेम साठी पूजा नावाची एक कन्या निश्चित करतात आणि तीला एयरपोर्ट वरून आणायची जबाबदारी अर्थात प्रेमवर येते. मग साहेब मुद्दामून वेगळ्याच टर्मिनलवर जाऊन उभे राहतात आणि पूजा विषयी काकाशी गप्पा मारत बसतात. इकडे स्वतःचे लग्न मान्य नसल्याने पळून आलेली आणि माफिया कुटुंबाशी निगडित असलेली असीन अर्थात संजना ह्याचे बोलणे ऐकते आणि पूजा असल्याचा बनाव करून प्रेमच्या घरात आश्रय घेते.मग सलमानचे असीन वर आणि असीनचे सलमानवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न अ‍ॅज युज्वल सुरु होतात. मग अचानक सलमानला असीनच्या सच्चाईचा पत्ता वैग्रे लागतो आणि मग लवकरच दोघांना आपण एकमेकांच्या प्रेमात पडल्याचा साक्षात्कार देखील होतो. मग हळूहळू संजनाच्या कुटुंबाची ओळख होते. तीचे दोन्ही मामा तिच्या २०० करोड रुपायाच्या फॅमिलीसाठी तीचे लग्न आपापल्या साल्यांबरोबर लावायच्या तयारीत असतात. हे दोन्ही मामा सख्खे भाऊ असूनही पक्के वैरी असतात बरे. पण अ‍ॅज युज्वल त्यांच्या बायका सोशिक, प्रेमळ आणि परिवाराला एकत्र आणण्याची इच्छा असलेल्या वैग्रे असतात. ह्या दोन्ही मामांचा अकाउंटंट म्हणजे परेश रावल. ह्या परेश रावलचा भाचा कम असिस्टंट बनून सलमान ह्या परिवारात प्रवेश करतो आणि मग पुढे काय होते ते सांगायची आवश्यकता नाहीच...सलमाननी चित्रपटभर अभिनय करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे जो अ‍ॅज युज्वल जमलेला नाही. सौथ फायटींग पुरता तो एकदम झकास, पण चित्रपटात अ‍ॅक्शन देखील चवीपुरतीच आहे. मुळात चित्रपट अ‍ॅक्शन करावा, रोमॅंटीक करावा का विनोदी करावा हेच लक्षात न आल्याने दिग्दर्शकाची प्रचंड गोची झाल्याचे चित्रपटभर जाणवत राहते. शेवटी त्याने हे सगळे एकत्र करून भेळ बनवण्याचा अतिशय केविलवाणा प्रयत्न केलेला आहे हे सतत जाणवत राहते. ना धड विनोद जमलाय, ना धड रोमांस. अभिनयाचा शंख कसा वाजलाय ते सांगायलाच नको. असीनचे १/२ क्लोजअप घेऊन बाकीच्या चित्रपटभर तिच्या ऐवजी राखी सावंतला घेतले असते तरी खपून गेले असते येवढी असीन ह्यात दुर्लक्षित आहे. महेश मांजरेकरला प्रत्येक वाक्यात एक शब्द विसरायला लावून काय विनोद घडवायचा प्रयत्न केला आहे ते शेवटपर्यंत समजत नाही आणि हसवत त्याहून नाही. परेश रावल एखाद दोन प्रसंगात मस्त धमाल करून जातो पण इतर दगडांची साथ न मिळाल्याने शेवटी फिकाच पडतो. पुनीत इस्सरच्या भूमिकेला देखील पाहुणी भूमिका का म्हणू नये हा अजून एक प्रश्न. अनुराधा पटेलचे बर्‍याच दिवसानंतरचे रुपेरी दर्शन सुखावह हेच त्यातल्या त्यात एक नशीब.सर्वात डोक्यात जातो तो सुदेश लेहरी. ह्या माणसाची भूमिका अक्षरशः विनाकारण आणि पाचकळपणासाठी घुसडलेली आहे हे स्पष्ट जाणवते. कॉमेडी सर्कस गाजवलेला हा कलाकार इथे अक्षरशः फुकट गेला आहे. अभिनयातला तोचतोचपणा आणि मूर्खासारख्या चेहर्‍याने केलेला वावर अतिशय भिकार. जॉनी लिव्हरची जागा घ्यायला त्याला अजून काही कष्ट घ्यावे लागणार नाहीत हे मात्र निश्चित.चित्रपटाला विनोदी म्हणता येईल असा एकही प्रसंग चित्रपटात नाही. तसा रोमँटिक प्रसंग देखील नाहीचे म्हणा. पात्राचे विचित्र हावभाव, एकमेकांना स्विमिंग पूल मध्ये ढकलणे, माफिया म्हणवले जाणारे आणि जोकर्स सारखे वावरणारे, बोलणारे गुंड आणि पाण्यात पडल्यावर 'मेरा वो गीला हो गया...' ह्या सारख्या संवादांना जर विनोदी म्हणले जात असेल तर मात्र आमचा साष्टांग नमस्कार आहे. अजय देवगण, संजुबाबा, झरीन सारख्या पाहुण्या कलाकारांना तर चित्रपटाच्या पहिल्या ५ मिनिटातच टाटा बाय बाय करण्यात आलेले आहे.

'ढिंक चिका..' हे एकमेव गाणे जे सतत ऐकून ऐकून कान किटलेत, ते सोडले तर एकही गाणे लक्षात राहतं नाही. प्रितम आणि देवी श्री प्रसाद ह्या दोन दिग्गजांनी दिलेले संगीत सतत ह्या आधी कुठेतरी ऐकले असल्याचे मात्र सतत जाणवत राहते. अनिस बझ्मी ह्याचेच ह्या चित्रपटाला डायरेक्शन आहे हे काय मनाला पटत नाही बॉ ! साफ फसला आहे हा माणूस.
एकूण काय तर अपेक्षा ठेवून अथवा न ठेवून देखील रेडी मनोरंजन करण्यात साफ अपयशी ठरतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा