गँग्ज ऑफ वासेपुर

|
'अनुराग कश्यप डोक्यावर पडला आहे' इथपासून ते 'येवढा चित्रपट लोकांनी का नाकारला?' अशा दुसर्‍या टोकाच्या प्रतिक्रियेपर्यंतच्या गप्पा 'गँग्ज ऑफ वासेपुर' ह्या चित्रपटाबद्दल ऐकत होतो. स्वतः अनुराग कश्यप आणि ज्यांना चित्रपटातले नक्की कळते (आसे आम्हाला वाटते) अशा दोन चार समीक्षकांनी देखील वासेपुरचे कौतुक केल्याने, आता नक्की भानगड आहे तरी काय हे बघणे आलेच होते. काल मग एकदाचा हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची कथा म्हणाल तर एका वाक्यात संपणारी आहे. 'वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यास मुलगा उत्सुक'. झाली संपली कथा. खरे तर संपली नाही, अजून एक भाग यायचा आहे. ह्या चित्रपटाचे समीक्षण लिहिताना, समीक्षण म्हणण्यापेक्षा ह्या चित्रपटाविषयी तुम्हाला माहिती देताना आधी चित्रपटाबद्दल घेतले गेलेले आक्षेप आणि चित्रपटाच्या चांगल्या वाईट गोष्टींची दखल घेऊ. सगळ्यात मोठा आक्षेप होता तो म्हणजे 'हा चित्रपट दोन भागात काढायचे कारणच काय ?' हा आक्षेप घेणार्‍यांवरती खदखदून हसावे, का त्यांची कीव करावी हेच मला नक्की कळत नाहीये. मुळात हा चित्रपटच पाच तासाचा आहे , हे किती आक्षेप घेणार्‍यांना माहिती आहे ? ह्या चित्रपटाचे पहिले दर्शन 'Cannes Directors' Fortnight' ला करण्यात आले होते, त्यावेळी संपूर्ण लांबीचा चित्रपट दाखवण्यात आला. बॉलीवूड आणि हिंदी दर्शक ह्यांची मानसिकता लक्षात घेऊन मग तो दोन भागात प्रदर्शित करण्याचे ठरवण्यात आले. आक्षेप २ :- चित्रपटातील किळसवाणे, अश्लीलतेकडे झुकणारे संवाद आणि हिंसा. इथे मात्र अनुराग कश्यपला विचार करण्यास नक्की संधी आहे. सरदार खान (मनोज वाजपेयी, रामाधीर सिंह (तिग्मांशु धुलिया) किंवा अगदी एहसान कुरेशी (विपिन शर्मा) हे अडाणी, असंस्कारीत असले तरी ते ज्या प्रकारे टोळ्या सांभाळत असतात ते बघता त्यांची भाषा अक्षरशः एखाद्या देशी दारूच्या गुत्तेवाल्याच्या तोंडी शोभावी अशी देण्यात आली आहे. ते रांगड्या भाषेत जे शब्द बोलतात, तेच शब्द अगदी वेगळ्या प्रकारे ह्या आधी आपल्या कानावरती गेले आहेत, पण ते सुसह्य होते. कारण 'सूंघ के देख आज मंत्रीजी ने क्या खाया है' किंवा 'तेरी कह के लूंगा' सारखी वाक्ये आपण 'खाया पिया सबको पता चल जायेगा' , 'तुम दोनोने एक ही आयटम बजाया था' अशा बंबय्या गॅंग्जच्या भाषेत ऐकली होती. जी कधी ना कधी कानावरून गेली होती, किंवा नसली तरी असह्य वाटली नव्हती. इथे मात्र अनुरागचे गुण नक्की कमी होणार. राहिला मुद्दा हिंसेचा, तर हात मुख्य संघर्ष दाखवला आहे तो कुरेशी आणि खान ह्या दोन स्थानिकांमधला. कुरेशी जमात ही खाटीक, त्यामुळे त्यांच्याकडून दाखवलेला हिंसाचार हा अक्षरशः कसाई बकर्‍या कापतो तसाच अंगावर येणार दाखवणे गरजेचे. कुठेतरी प्राणी आणि माणसे ह्यात हे कुरेशी काहीच फरक जाणत नाहीत असे काहीसे दाखवण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल. दुसर्‍या बाजूला वर्षानुवर्षे कुरेंशीच्या आधिपत्याखाली पिचणारे खान जेव्हा स्वतःच्या ताकदीवरती विश्वास ठेवायला लागतात, तेव्हा त्याच्याकडून आलेले प्रत्युत्तर देखील त्याच ताकदीचे दाखवणे गरजेचे होते. वर्षानुवर्षाचा राग, संताप, द्वेष, अन्यायाची चीड ही त्या हल्ल्यांमधून बाहेर पडत असताना दिसायला हवीच होती. 1 हा हिंसाचार अंगावरती काटा आणतो हे नक्की, पण ह्याहून अधिक भयावह हिंसाचार आपण पाहिलेला आहे. अर्थात तो अ‍ॅटोमॅटिक रायफल्स, मशीनगन्स इत्यादींनी केलेला असल्याने आपल्या सरावाचा आहे. पण हा चित्रपट ज्या कालखंडात घडतो तो कालखंड पाहता त्या काळातल्या हत्यारांनीच हा हिंसाचार लडबडलेला असणे योग्यच नाही का ? खाटीक त्याच्या हातातल्या सुर्‍याने एखाद्याला मारेल, तेव्हा तो काय अगदी व्यवस्थित पोटात सुरा खुपसणे ह्या सारखे प्रकार करणार नाही. तो सरळ बकरा कापतो तसे खपाखप वार करणार आणि मोकळा होणार. आक्षेप ३ :- अनुराग कश्यप डायरेक्टर म्हणून कुठेच जाणवत नाही. बिहार देखील मनात ठसत नाही. हा आक्षेप घेणारी बहुतांश मंडळी ही 'प्रकाश झा, रामगोपाल वर्मा ' ने झपाटलेली असावीत असा मला संशय आहे. झा साहेबांनी आपल्या अनेक चित्रपटांमधून जो बिहार उभा केला, तो बिहारच आता दर्शकांची ओळख बनला आहे. बिहारचे राजकारणी, बाहुबली, तिथली घरे, पोलीस, तिथली भाषा ह्या सगळ्यांचा एक वेगळाच ठसा काही लोकांनी स्वतःवरती उमटवून घेतला आहे. मराठी माणूस म्हणजे हवालदार किंवा हीरोचा मूर्ख मित्र, किंवा गेला बाजार जोकर वाटावा असा राजकारणी अशी जी एक प्रतिमा काही काळापूर्वी बॉलीवूड मध्ये होती, तसेच काहीसे बिहारचे होत आहे. मुळात हा चित्रपट बिहारचा उत्कर्ष / अधःपतन / तिथल्या राजकारणाच्या खेळ्या, बाहुबलींचे राज्य, स्वातंत्र्याचे फायदे -तोटे हे ज्या काळात सुरू झाले, तो काळ दाखवतो हे आधी लक्षात घ्यायला हवे. ह्या चित्रपटाकडून तुम्ही एकदम मुरलेले राजकारणी, सहजपणे गळा चिरणारे आणि नामानिराळे राहणारे बाहुबली, कर्तव्यदक्ष / लाचखोर पोलीस बघण्याची अपेक्षाच करू शकत नाही. तसेच रामगोपाल वर्मा दाखवतात त्या काळातल्या गँगवॉरची आणि बिहारमधल्या चित्रपटात दाखवलेल्या काळाची तुलना देखील अशक्यच. 2 आक्षेप ४ :- मनोज वाजयेपी एकटा चित्रपटा तारून नेऊ शकत नाही. तो वगळता इतर कोणी ओळखीचे पण नाही. ह्या आक्षेपावरती तर काय बोलावे तेच कळत नाही. अहो, हा चित्रपट आहे, प्राणिसंगहालय नाही. एका तिकिटात जंगलातले सगळे प्राणी बघता येतात, तसे तुम्हाला सगळे हीरो आणि हिरवण्या बघायच्या असतात का ? बरं ह्या चित्रपटात मोठी स्टारकास्ट घेतली असती, तर हेच लोक 'कथेत दम नाही म्हणून कलाकारांची फौज गोळा केली आहे' असे गळे काढत बसले असते. काही चित्रपट हे कथांसाठी नाही, तर सादरीकरणासाठी बघायचे असतात हे लक्षात कधी घेणार? ह्या चित्रपटात नीट लक्ष दिले तर मोठे मोठे सीन्स तुम्हाला कुठेच दिसणार नाहीत. लांब, पल्लेदार संवाद किंवा अभिनयाची जुगलबंदी इथे आणलेली देखील नाही. प्रत्येक भूमिकेला न्याय मात्र नक्की मिळालेला आहे. खरेतर ह्या चित्रपटातील सर्वच पात्रे ही एकमेकांना पूरक आहेत, आणि ह्या आधी कुठल्याही भूमिकेचा शिक्का बसलेला नसणे हीच ह्या पात्रांची खरी गरज होती. अनुरागने अतिशय चाणाक्षपणे हे हेरून नवोदितांना मोठ्या अपेक्षेने इथे संधी दिली आहे, आणि त्यांनी देखील त्याचे सोने केले आहे. आता चित्रपटाची कथा थोडी समजावून घेऊ. ब्रिटिश अमदानीत कुख्यात डाकू सुलतान ह्याची चांगलीच दहशत असते. ह्या सुलतान डाकूचे खोटे नाव घेत त्याच्या नावाने शाहीद खान हा ब्रिटिशांच्या ट्रेन्स लुटायला लागतो आणि चित्रपटाच्या मूळ कथानकाला सुरुवात होते. ही गोष्ट कळल्यावरती पिसाळलेला सुलतान डाकू खरेतर शाहीदच्या जीवावरच उठतो पण शेवटी सामंजस्य होऊन शाहीदला गावाबाहेर हाकलले जाते. गावाबाहेर पडलेला शाहीद आता थोड्या फार संघर्षानंतर रामाधीर सिंग ह्या कोळसा खाणीतील ठेकेदाराकडे 'पैलवान' अर्थात पाळलेला गुंड म्हणून काम करायला लागतो. शाहीदचा वाढता दबदबा बघून वेळीच पुढचा धोका ओळखून रामाधीर सिंह त्याला संपवतो. इकडे शाहीदचा मुलगा सरदार खान मात्र आपल्या काका बरोबर पळून जाण्यात यशस्वी होतो आणि त्याचा जीव वाचतो. आता सूडाने पेटून उठलेला सरदार खान रामाधीरचा बदला घ्यायला निश्चय करतो. ह्या बदल्याच्या ठिणगीचे आगीत होत जाणारे रूपांतर आणि ह्या आगीत जळणारी ओली सुकी लाकडे म्हणजे 'गँग्ज ऑफ वासेपुर' हा चित्रपट. काही चित्रपट हे कथांसाठी नाही, तर सादरीकरणासाठी बघायचे असतात असे मी वर म्हणलेच आहे. ह्या अपेक्षेत अनुराग उतरला आहे का ? म्हणले तर हो, म्हणले तर नाही. चित्रपटातला संघर्ष हा हळूहळू अनुरागने उत्तमपणे वाढवत नेलेला आहे. पण कोळशाच्या खाणींचे राजकारण, स्वातंत्र्यानंतर त्यांची बदललेली मालकी आणि ह्या पैसेवाल्या पण कोळसा खाणींचे ज्ञान नसलेल्या मालकांची धडपड, बाहुबलींचा उदय, कोळसा खाणींचा अस्त आणि त्यामुळे बदलत जाणारे समाजकारण ह्या गोष्टी आपल्यापर्यंत फक्त संवादा द्वारे पोचतात, त्यामुळे त्या म्हणाव्या तशा ठसत नाही. ह्या गोष्टी अधिक सुसंगत आणि नेमकेपणाने दाखवल्या असत्या तर चित्रपटाची रंगत अजून वाढली असती. सरदार खानच्या डोक्यातील बदल्याची आग दाखवतानाच, हा सरदार खान कसा स्त्री लंपट आहे, वेळेला मुलांवरती जीव टाकणारा आहे, वेळेला जमातीतील लोकांच्या अडचणीला उभा राहणारा आहे, हे कंगोरे दाखवत अनुराग त्याला सर्वसामान्य पातळीच्या वरती जाऊ न देण्याची जी दक्षता घेतो ती खरंच सुंदर आहे. ह्यामुळे हा संघर्ष फक्त एकट्या सरदार खानचा न उरता, एका समुदायाचा बनत जाण्यास मदत होते. चित्रपटाचे संगीत उत्तम आहे. 'इक बगल मे चांद होगा' आणि 'वुमनीया' ही गाणी तर अप्रतिमच. वेगवेगळ्या प्रसंगांना धार आणण्यासाठी पार्श्वसंगीत आणि गाणी ह्यांचा केलेला वापर वाखाणण्याजोगा. अभिनयाच्या बाबत म्हणाल तर मनोज वाजपेयी सोडता बरेचशे चेहरे हे नवोदित आहेत. मात्र आपल्या अभिनयात ते कुठेही नवखेपणा जाणवून देत नाहीत. उत्तम प्रकारे समजून उमजून अभिनय त्यांनी केलेला आहे. सरदार खान आता बाहुबली म्हणून प्रस्थापित झालेला आहे आणि त्याच्या हाताखाली त्याची दोन तरूण मुले देखील आली आहेत. अशातच सरदार खानवरती जीवघेणा हला होतो, आणि ह्या टप्प्यावरती चित्रपट संपतो. चित्रपट एकदा तरी पाहाच असा आग्रह करणार नाही, पण 'काहीसे वेगळे' चित्रपट बघण्याची आवड असल्यास हा चित्रपट बघायला नक्की हरकत नाही.

शांघाय

|
विकांताला मेंदूला झालेला त्रास बघता ह्या वेळी मेंदूचा वापरच करावा लागणार नाही असा एखादा मसालापट बघायचे ठरवले आणि पावले चालली 'शांघाय'ची वाट. 'पोलिटिकल थ्रिलर' असा गाजावाजा झालेला हा चित्रपट ना पोलिटिकल थ्रिलरच्या अपेक्षा पूर्ण करतो ना नुसत्या थ्रिलरच्या. हा काही काही प्रसंगात थिल्लर वाटण्यात मात्र तो यशस्वी झाला आहे हे नक्की. भडक अभिनय, अभिनय संपन्न पात्रांचा न करता आलेला वापर, उत्कर्ष बिंदू पर्यंत पोचतोय असे वाटत असतानाच टिपीकल मसाला वळण घेणारा संघर्ष ह्या सर्वांमुळे चित्रपट आपल्याला फार काही गवसून देत नाही. मग चित्रपटात बघण्यासारखे काहीच नाही का ? आहे ! अभय देओलचा सुरेख अभिनय आणि बर्‍याच कालावधी नंतर फारुख शेखचा सहज सुंदर वावर ह्यासाठी एकदा तरी चित्रपट बघायला नक्की हरकत नाही. अर्थात फारशा अपेक्षा ठेवायच्या नाहीत हे ओघाने आलेच. व्हॅसिलीसच्या 'Z' ह्या नॉव्हेलवरती आधारीत ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत दिबाकर बॅनर्जी. खोसला का घोसला, ओये लकी लकी ओये, लव्ह सेक्स धोका असे थोड्या हटके थीमचे चित्रपट बनवणारा दिबाकर बॅनर्जी ह्या चित्रपटात देखील वेगळे काही देण्याचा प्रयत्न नक्की करतो पण कुठेतरी प्रयत्नात कमी पडल्याचे नक्की जाणवत राहते. चित्रपटात अभय देओल, फारुख शेख, कल्की कोचलीन, प्रोसेनजीत चटर्जी अशी तगडी स्टारकास्ट आहे. चक्क चक्क आपला चिन्मय मांडलेकर देखील आहे. तुकड्या तुकड्यांनी आलेल्या प्रसंगात एकदम भाव खाऊन गेला आहे बेटा. ह्या चित्रपटाची कथा ऊर्मी जुवेकर ह्या मराठी मुलीचीच आहे हे एक विशेष. भारतनगर मध्ये सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्यावरती येऊ घातलेले एक मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आणि त्यावरून सुरू झालेला राजकीय काटा काटीचा खेळ हे ह्या चित्रपटाचे कथासूत्र. प्रोजेक्टला पाठिंबा देणारे आले म्हणजेच विरोध करणारे देखील येणारच. डॉ. अहमदी (प्रसेनजीत) हे असेच हाय प्रोफाइल सामाजिक कार्यकर्ते ह्या प्रोजेक्टच्या विरोधात दंड थोपटतात. कल्की अर्थात शालिनी ही एकेकाळची त्यांची विद्यार्थिनी आणि त्यांच्या प्रेमात पडलेली मुलगी. हिचे स्वतःचे वडील सैन्यात अधिकारी असतात आणि सध्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा भोगत असतात. तर ह्या शालिनीला डॉ. अहमदी शहरात आल्यास त्यांच्या जीवाला धोका असल्याचे आपल्या मोलकरणीकडून कळते आणि ती त्यांना सावध करण्याचा प्रयत्न करते. मात्र 'आखरी सांस तक लढना हे!' हा मंत्र जपणारे अहमदी शहरात हजर होतातच. नेहमीप्रमाणेच अशा लोकांची जी गळचेपी चालू होते ती त्यांना देखील अनुभवायला मिळते. पोलिसांची कुमक नाही म्हणून सभेला संरक्षण पुरवता येणार नाही, आणि त्यामुळे मग सभेला परवानगीच नाही असे त्यांना कळवण्यात येते. अहमदी मात्र सभा होणारच ह्या जिद्दीला पेटतात. त्यांना विरोध करायला सत्ताधारी पार्टीचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित असतातच. ह्या कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजी समोर पोलीस नुसते बघ्याची भूमिका घेऊन उभे असतात. छोटीशी दगडफेक, अहमदींच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण असे प्रसंग घडत जातात आणि सभा संपवून परत येत असताना चौकातच एक टेंपो सरळ अहमदींना उडवून निघून जातो आणि चित्रपट संघर्षाच्या एका टोकावरती येऊन पोचतो. कोमात गेलेल्या अहमदींना अपघात झाला नसून तो खूनच आहे अशी शालिनीची पूर्णं खात्री असते. मग न्यायासाठी धडपड करण्याची ती तयारी सुरू करते. अशातच अहमदींची एकेकाळची विद्यार्थिनी आणि आताची बायको हजर होते आणि चित्रपट वेग पकडू लागतो. लग्नानंतर देखील अहमदींच्या कार्याने भारावलेली त्यांची बायको आता मात्र हताश आणि निराश झालेली आहे आणि अशा आंदोलनाला काहीच फळ नसल्याच्या जाणिवेने ह्या सगळ्यातून बाहेर देखील पडली आहे. आता मात्र ती नवर्‍याला न्याय मिळावा म्हणून धाडसाने उभी राहिली आहे. प्रकरण चांगलेच जोर धरू लागले आहे हे बघून मुख्यमंत्री मॅडम (सुप्रिया पाठक) चौकशीसाठी क्रिष्णन अर्थात अभय देओलची एक सदस्यीय समिती नेमतात. ह्या अभयला रिपोर्ट करायचा असतो तो आपल्या बॉसला फारुख शेखला. मुरलेला राजकारणी, कसबी आणि व्यवहारी मनुष्य असे विविध कंगोरे फारुख शेखने आपल्या ह्या भूमिकेद्वारे दाखवले आहेत. तर दुसर्‍या बाजूला प्रामाणिक, सामाजिक अशांततेने अस्वस्थ होणारा, अधिकार असून देखील बजावता येत नसल्याने हतबद्ध झालेला आणि मोक्याच्या क्षणी सगळी बुद्धी पणाला लावत डावात रंगत आणणारा व्हा‌इस चेहरमन अभय देओलने झकास साकारला आहे. संयत अभिनय, कुठेही आक्रस्ताळेपणा नाही असा कृष्णन त्याने निव्वळ काही शब्दांचे टिपीकल मद्रासी उच्चार आणि मद्रासी लहेजावाली हिंदी ह्या जोरावरती उभा केलेला आहे. कृष्णनला नेहमीप्रमाणेच गुन्ह्याच्या दिवसाची पोलीस स्टेशनमधली डायरी न मिळणे, खात्यांतर्गतची माहिती देता येणे शक्य नाही ह्या कारणाने पोलीस खात्याकडून माहिती द्यायला टाळाटाळ, मुख्य पोलीस अधिकारी (चिन्मय मांडलेकर)चे असहकाराचे धोरण आणि गुन्ह्यांवरती पांघरूण घालण्याचे प्रयत्न असे अनुभव यायला सुरुवात होते. ह्या सर्वातून कृष्णन हळूहळू पण ठाम मार्गाने पुढे सरकतच असतो. अशातच जोगींदर शर्मा (इम्रान हाश्मी) हा पॉर्न फिल्म मेकर + राजकीय सभांमधला फोटोग्राफर आपल्याकडे अहमदींच्या अपघाता विषयी काही ठोस पुरावे असल्याचा दावा करतो आणि कथेला वेगळेच वळण लागते. शालिनी आता जोगींदरच्या साहाय्याने ह्या प्रकरणाचा गुंता सोडवायला सुरुवात करते. अपेक्षेप्रमाणेच त्यांना गुंड कार्यकर्त्यांच्या हल्ल्यांना सामोरे जावेच लागते. अशातच जोगींदरच्या हाताला असा एक भक्कम पुरावा लागतो जो सरकारला सुरुंग लावण्या येवढा स्फोटक असतो. जीवावरती उदार होऊन ते हा पुरावा कृष्णनकडे घेऊन हजर होतात, पण त्या आधीच 'क्यूं ना ते बीना दातवाला आयोग बंद कर के, CBI को इसकी छान बीन करने दी जाये' असे म्हणत मुख्यमंत्री मॅडम आयोग बंद करण्याचा निर्णय घेऊन मोकळ्या झालेल्या असतात. आता हा पुरावा अभय देओल कसा आणि कुठे वापरतो, ह्या पुराव्याचा खरंच काही उपयोग होतो, का तोच स्वतः अडचणीत सापडतो, नक्की राजकारण काय वळण घेते हे प्रश्न सोडवायचे असतीत तर मग शांघायची सहल करणे गरजेचे. अभिनयात अभय देओल आणि फारुख शेखने बाजी मारलेली आहे. थोडासा आक्रस्ताळेपणा सहन करता आला तर कल्की देखील बरीचशी सुसह्य आहे. लगाम व्यवस्थित घातला तर इम्रान हाश्मी देखील सुसह्य वाटू शकतो हे जन्नत २ नंतर पुन्हा एकदा ह्या चित्रपटात अनुभवता येते. चित्रपटात बर्‍याच खटकणार्‍या गोष्टी मात्र जागोजागी दिसतात. भ्रष्टाचार विरोधातील एक प्रमुख कार्यकर्ती, डॉ. अहमदींच्या अगदी जवळची असलेली कल्की. ह्या कल्कीच्या वडिलांना भ्रष्टाचाराच्या आरोपात शिक्षा झालेली आहे, असे असताना कुठलाच मिडिया ह्याची दखल कशी घेत नाही ? 'डॉ. अहमदींचे समर्थकच भ्रष्टाचाराशी जोडले गेलेले आहेत' हे ठामपणे जनतेसमोर आणणे शक्य असताना, सरळ त्यांच्यावरती हल्ला का केला जातो हे कोडे उलगडत नाही. त्यांच्या अपघाताच्या वेळी तिथे हजर नसलेला जोगींदर पुढे त्या टेंपोच्या ड्रायव्हरला (अनंत जोग) कसे काय ओळखतो ?, राजकीय कार्यकर्ते हे सहजपणे खून, जाळपोळ करून कसे वावरू शकतात? ते कार्यकर्ते कमी आणि सुपारी घेऊन थंड डोक्याने खून करणारे जास्ती शोभतात. असे काही खटकणारे प्रश्न सोडले, तर एकुणात चित्रपटाला 'बरा आहे' असे म्हणायला हरकत नाही.

तुकाराम... हे राम !

|
तुकारामांची बेअब्रू झाली किंवा नालस्ती झाली तर आपल्याला केस गुदरता येते का हो ? का तुकोबांचे नातेवाईक असणे कंपल्सरी आहे ? तुकोबांच्या बाबतीत मानवी हक्क संघटना मदत करू शकेल काय ? बराच गाजावाजा झालेला आणि चालू असलेला तुकारामा हा चंद्रकांत कुलकर्णी ह्यांचा चित्रपट पाहून (खरेतर पहिल्या ४ मिनिटातच) पडलेले हे काही प्रश्न. खरंच सांगतो, एक..फक्त एक थप्पड किंवा बुक्का तुकारामांना कोणालातरी मारताना दाखवले असतेना तर हा चित्रपट सौथ स्टाइल म्हणून आरामात खपवता आला असता. सुट्टी चालू आहे तर लहान मुले हट्ट धरायला हवीत म्हणून बाल हनुमान, बाल गणेश तसा बाल तुकाराम, त्याच्या लीला, गाणी दाखवणे, बायकांच्या आडियन्सला रडवायला मेलोड्रामा, गेला बाजार गावाकडचे पब्लिक आकर्षीत करायला दुष्काळ, विवक्षित पब्लिकला खेचायला नाकात बोलणार्‍या बामणांचे प्रताप हे सगळे सगळे सोपस्कार पार पाडताना कुलकर्णी आणि कंपनीची जी काय ससेहोलपट (खरेतर हसेहोलपट) झाली आहे, ती बघवत नाही. अक्षरशः २.४५ मिनिटे अत्याचारा वरती अत्याचारा सहन करावा लागतो. 'साहस टाळा' असे रविवारचे राशी भविष्य सकाळी सकाळी वाचत असतानाच डाण्रावांचा फोन आला आणि संध्याकाळ म्हणता म्हणता दुपारच्या शो चा प्लॅन पक्का केला आणि तुकाराम चित्रपटाला हजेरी लावली. तुकोबांना विठ्ठलाचा ध्यास लागला होता आणी आम्हाला तुकोबांचा. अन्न पाणी काही ग्रहण करण्याची संधी देखील मिळाली नाही पण आम्हाला त्याचा खेद वाटला नाही. तर आधी आपण पात्रांचा परिचय करून घेऊ. पात्रं म्हणजे एकेक पात्रंच आहेत म्हणा. बोल्होबा अंबीले (तुकारामांचे वडील) = शरद पोंक्षे अर्थात मराठी चित्रपट सृष्टीतील बाबा महाराज सातारकर. हा माणूस कुठलाही संवाद निरूपण केल्याच्या थाटातच बोलतो. बाबा महाराजांसारखीच दर चार मिनिटांनी डोळे मिचकावण्याची देखील सवय. डोक्यात अजूनही नथुराम घुसलेला आहे, त्यामुळे बर्‍याचदा संवादाच्या शेवटी शेवटी आवाज भयानक चिरका होतो. पात्र बरेचशे सुसह्य. कनकाई (तुकारामांची आई) :- प्रतीक्षा लोणकर. दामिनी दामिनी दामिनी.... अभिनय समजून उमजून करण्यात यशस्वी. फारशे भावनिक प्रसंग वाट्याला न आल्याने भूमिका उत्तम वठवली आहे. पात्र सुसह्य. सावजी (तुकारामांचे वडील बंधू) :- वृशसेन दाभोळकर. चित्रपटात मोजून चार ते पाच वाक्ये बोलण्याची गरज पडल्याने माणूस कामगिरी निभावून नेतो. बराचसा अभिनय हा शारीरिक करावा लागला असता तरी त्यात छाप पाडून जातो. संसार सोडून मोक्षप्राप्तीसाठी परागंदा झाल्यावरती आलेले शहाणपण मोजक्या शब्दात पण छान मांडतो. पात्र सुसह्य. मंजुळा (सावजींची पत्नी) :- स्मिता तांबे. संन्यासी वृत्तीचा आणि कधीही पतीधर्म न निभावणारा माणूस आयुष्याच्या दावणीला बांधला गेल्यावरती झालेली घुसमट छान व्यक्त करते. सासू मेल्या नंतरच्या प्रसंगात मात्र तिने केलेला अभिनय (नवर्‍यावरती दाखवलेला त्रागा) अतिशय बालिश आणि नाटकी. खरेतर हा प्रसंगच पूर्णतः अनावश्यक. ह्या प्रसंगात आई गेल्यामुळे कोसळलेला, निराधार झालेला सावजी निव्वळ शारीरिक अभिनयातून आपल्या मनाला त्याची तडफड जाणवून देत असतानाच, ह्या प्रसंगात अचानक येऊन स्मिता तांबेचे किंचाळणे, बोंबलणे आणि पाठोपाठ मख्ख आणि शांत चेहरा करून तुकारामाने बाहेर येऊन "काय झाले वहिनी" विचारणे खरंच संताप आणते. रखमा (तुकारामांची पहिली पत्नी) :- विणा जामकर. आपण विद्या बालन नाही हे ह्या बाईला कळेल तो दिवस तिच्यासाठी आणि आपल्यासाठी सुदिन. ह्यासाठी तिने ज्यू. मेहमूदची वाताहात डोळ्यासमोर ठेवली तरी प्रगती निश्चित. आवली (तुकारामांची दुसरी पत्नी) :- राधिका आपटे. 'मात्र रात्र, रक्तचरित्र मधली राधिका ती हिच का' असा प्रश्न पडण्या येवढा भिकार अभिनय. त्याला अभिनय तरी कसे म्हणावे ? फारतर चित्रपटातला वावर असे म्हणू. ही आवली अक्षरशः कॉमीक वाटते हो. अत्यंत नाटकी अभिनय, 'कर्कशा' असे तुकारामबुवांनी आपल्या अभंगात केलेले वर्णन फिक्के पाडणारी प्रत्येक संवाद किंचाळून आणि हेल काढून बोलण्याची लकब ह्यामुळे आवली हे पात्र अक्षरशः डोक्यात जाते. ना धड तिचा त्रागा समोर येतो, ना धड तुकारामांवरचे प्रेम. पुर्णत: फसलेले आणि असह्य पात्र. मठाधिपती (रवींद्र मंकणी ):- फक्त एका दृश्यापुरता वावर. सिंव्हासनावरती बसण्याची ऐट आणी संवादाची फेक अप्रतिम. ह्या माणसाला त्या सिंव्हासनावरती असे झोकात बसलेले पाहिले आणि वाटले असेच उचलून ह्यांना शनिवारवाड्यावरती नेऊन ठेवावे. हे रूप, ही ऐट, हा माणूस बघून तो शनिवार वाडा देखील पुन्हा गर्वाने उभा राहील, ती कारंजी पुन्हा ताल धरतील, ते रेशमी पडदे सळसळतील, आमची मस्तानी नाजूक आदाब करत उभी राहील आणि कुठूनतरी ललकारी उमटेल "बाअदब बामुलाहिजा..." मंबाजी (यतीन कार्येकर) :- संपूर्णतः दिग्दर्शक म्हणेल त्याला मान डोलवून केलेला अभिनय. पात्र पूर्णतः फसलेले. त्याचा तुकारामांवरचा राग, धर्माचा दांभिक अभिमान, स्वतःच्या बुद्धीचा गर्व, ब्राह्मण्याचा माज काही काही म्हणून मनावरती ठसत नाही. दोन लहान मुलांमध्ये चाललेली भांडणे देखील अधिक प्रभावशाली वाटतील. कार्येकरांनी पाटी टाकली आले असे खेदाने म्हणावे लागेल. पात्र मनालाच पटत नसल्याने असह्य. तुकाराम (जितेंद्र जोशी) :- 'कुठे आहेत तुकाराम ?' असे शेवटापर्यंत वाटायला लावणार अभिनय. प्रत्येक दृश्यात प्रत्येक फ्रेम मध्ये हा जितेंद्र जोशी आहे हेच जाणवत राहते. कुठल्याच क्षणी आपण त्या पात्राशी तुकाराम आहेत म्हणून एकरूप होऊ शकत नाही. अतिशय मख्ख चेहर्‍याने वावर. मध्येच बापुडवाणा चेहरा करून इकडे तिकडे बघणे म्हणजे तुकाराम उभा करणे नव्हे. अतिशय संथ संवाद फेक. तुकाराम व्यवहारी, रोमँटीक, समाजसुधारक इ. इ. सर्व काही गुणयुक्त दाखवण्याच्या प्रयत्नात स्वतः दिग्दर्शकच आपटल्याने जोशी साहेब त्याच्या जोडीने पडल्याचे आश्चर्य वाटत नाही. नो सर ! हे तुकाराम आमचे नाहीत, रादर आमच्या ध्यानी मनी देखील असे तुकाराम कधीच नव्हते. बाल तुकाराम (पद्मनाभ गायकवाड) :- विठ्ठलाला एकदा मिठी मारून भक्तीचा पूर आणि विठ्ठलप्रेम दाखवणे ह्यापुरती गरज असताना निव्वळ बालचमूच्या गर्दीसाठी ताण ताण ताणलेले पात्र. ह्याच्या बाललीला तर काय वर्णाव्यात... पात्र मात्र बरेच सुसह्य. भारत गणेशपुरे, प्रशांत तपस्वी आणि हो विक्रम गायकवाड हे देखील चित्रपटात आहेत. हो.. हो.. तेच आपले विक्रम गायकवाड फकिराचा रोल करताना दिसतात. माझी खात्री नाही, पण ह्या चित्रपटात ३ प्रसंगात (एकदा बाल तुकाराम बाललीला दाखवत सवंगड्यांबरोबर गाणे गात खेळत असताना दोन हात आकाशाकडे करत कबीराचा कुठलासा दोहा गात कॅमेर्‍यासमोरून इकडून तिकडे वाटचाल, एकदा तोच दोहा म्हणत तुकारामांच्या वाड्यावरती झोळी पसरत येणे आणि शेवटी दुष्काळात मरून जाणे) जे दिसतात ते गायकवडच असावेत असे वाटते. येवढा हट्टा कट्टा माणूस दुष्काळात मेलेला पाहून हळूच खुदकन हसायला येते हो. तर आता चित्रपटाच्या कहाणीकडे वळू. माफ करा, कहाणी नाही... ऐतिहासिक सत्य. हान तर सुरुवात होते बाललीलांपासून. बाल तुकारामाचे सवंगडी त्याला शोधत आहेत आणि तो सापडत नाहीये. मग त्याला शोधणारा 'तुक्या कधीच सापडत नाही' अशी तक्रार करतो आणि शेवटी मग सगळे सवंगडी त्याला देवळात शोधून काढतात. बाल तुकाराम विठ्ठलाच्या मूर्तीला मिठी मारून ब्रह्मानंदी टाळी लावून रममाण झालेले असतात. ह्या दृश्यावरून आपण सुजाण प्रेक्षकांनी 'तुक्या कधीच सापडत नाही' कारण तो कायम ह्या देवळातच रममाण झालेला असतो, ह्या बालवयात त्याच्या अंतरात्म्यात भक्तीची ज्योत प्रज्वलित झालेली आहे येवढे सगळे अर्थ समजून घ्यायचे. ही ज्योत पुढे १४ रिळे कुठे गायब होते हे मात्र विचारायचे नाही. नाहीतर मग आम्ही तुम्हाला नव्या बदलाला नाक मुरडणारे प्रेक्षक म्हणू. कुलकर्णींनी ह्या चित्रपटात प्रेक्षकांच्या डोक्याला खूप खाद्य पुरवले आहे बरे. अनेक दृश्ये तुम्हाला काही सांगून, सुचवून जातात. मात्र ते समजण्याची तुमची पात्रता पाहिजे. आर्ट फिल्म मध्ये बघा, हीरोच्या कायम मळकट रंगाच्या शर्टाच्या जागी गुलाबी, हिरवा शर्ट दिसायला लागला, त्याच्या रेडिओवरती गंधर्वांच्या जागी रफी गायला लागला, कुंडीत गुलाब उगवला की त्या हीरोचे आयुष्य पालटले आहे, तो प्रेमात पडला आहे हे आपण जसे समजून घ्यायचे असते, तसेच इस्त्रीच्या स्वच्छ अंगरख्यामधून तुकाराम चुरगाळलेल्या अंगरख्यात आले, जप्ती - मसाले - मेथीची भाजी हे शब्द सोडून संदीप खरे सारखे एकदम (गाडी सुटली, रुमाल हालले.. च्या थाटात) 'कुठून फुटला हा कोंब, कुठे मिळाले जीवन जगण्याचे बळ त्याला..' असे म्हणायला लागले म्हणजे विरक्त झाले, विठ्ठलाच्या ध्यासाला लागले हे समजून घ्यायचे. किती सोपे आहे का नाही ? तर आपण कुठे होतो ? हान.. तर तुकारामांच्या बाललीला चालू असतानाच एकेक पात्रे आपल्या परिचयाची होत जातात. वडील बंधू सावजी हे देवधर्माच्या नादाने पुर्णतः एकलकोंडे आणि जगाच्या पार पोचलेले असतात. चार गाढवे सांभाळणे आणि मसाला पोचवणे हे कार्य देखील त्यांना जमत नसते. अर्थातच मग लहानग्या तुकोबांची वर्णी वडलांच्या हाताखाली लागते. देवाचा आशीर्वाद घ्यायला वाकलेले बाल तुकाराम एकदम लग्न झालेले तरणेबांड तुकाराम होऊनच उभे राहतात. बाललीला संपल्या म्हणून लगेच निःश्वास टाकायचा नाही. आता एकदम व्यवहारी, मिश्किल, न्याय - अन्यायाची चाड असणारे आणि रॉमेंटीक तुकाराम आपल्या समोर सादर होतात. हे धक्के एका मागोमाग एक पचवत असतानाच एकदम दुष्काळ दाखल होतो. आधी वडील, मग आई असे लोक एका मागोमाग एक गमवायची वेळ तुकारामांवरती येते. दामाजीपंतांची गोष्ट ऐकून तुकाराम आपल्या घराची धान्य कोठारे खुली करतात आणि भणंग होतात. सावजी परागंदा होतात, भुकेपोटी खणून आणलेली कंदमुळे विषारी निघतात आणि लहानग्या सकट अजून काही मृत्यू घरावर हल्ला करतात. हे सर्व बघता बघता आपण पण मरून जाणार असे वाटत असतानाच तुकोबांना भेगाळलेल्या भुईमध्ये एक कोंब उगवलेला दिसतो आणि त्यांना एकदम अभंगाची स्फूर्ती येते. त्यांना इकडे साक्षात्कार होतो आणि तिकडे ताबडतोब पाऊस सुरू होतो. पावसाला जीवनदायी, स्फूर्तीदायी का म्हणतात ते मला तेव्हा कळले, कारण पाऊस चालू झाल्या झाल्या इंटरव्हल झाले. इंटरव्हल नंतर जी-टॉक, फेसबुक ह्यांचा आसरा घेतल्याशिवाय आता टाईमपास करणे अशक्य आहे असे डाण्राव आणि प्रिमोने जाहीर केल्याने आमचा मोर्चा पुढच्या मोकळ्या पडलेल्या खुर्च्यांकडे वळला. आम्ही तिकडे वळलो आणि तुकाराम अध्यात्माकडे वळले. गेले दीड पावणे दोन तास हरवलेली त्यांची विठ्ठलभक्ती अचानक उफाळून आली आणि ते पांडुरंगाला वदले 'लोकं म्हणतात मला तुझं वेड लागलंय'. त्यांचे माहिती नाही, पण येवढ्या वेळात प्रेक्षकांना मात्र नक्की वेड लागलेले असते. आता विठ्ठलमय झालेले तुकाराम सावकारी सोडतात, लोकांचे त्यांच्याकडे गहाण पडलेले सर्व मुक्त करतात आणि अभंग रचनेला सुरुवात करतात. काम धाम सोडून चार चार दिवस डोंगरावरती जाऊन भक्तीत लीन व्हायला लागतात. इकडे मग ते आवली जे काही अभिनयात सूट सूट सुटते, की तुकारामांना 'तुमच्या ऐवजी मी शेतात राबतो पण ह्या बाईला आवरा' असे सांगावेसे वाटायला लागते. काय भिकार अभिनय करते हो ही बया. हिच्या नाटकी आणि कर्कश्य अभिनयापुढे मुनमुनसेनच्या कन्या देखील फिक्या पडतील. मग ह्या आवलीच्या किंचाळण्याने तुकाराम पुन्हा ताळ्यावरती येतात आणि शेती करायला लागतात. पुढच्याच दृश्यात ते एकदम शेत वगैरे पिकवून धान्याची रासच ओतताना दाखवले आहेत. मग एकदा रास ओतली की पुन्हा एकदा 'ये रे माझ्या मागल्या'. मधल्या काळात त्यांनी आपल्या वडिलोपार्जित विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असल्याने त्यांचे अभंग रचणे, कीर्तन करणे आणि विठ्ठलात गुंतणे एकदम जोमाने चालू होते. आता तुकाराम संसारातून पूर्ण अंग काढल्यासारखेच वागायला लागतात. त्यांची संत म्हणून कीर्ती वाढत जाते आणि लगेच गावातला दुसरा सावकार, नाकात बोलणारे ब्राह्मण ह्यांचा पोटशूळ वाढत जातो. ब्राह्मण, मग ते अगदी शिवाजीराजांच्या काळातले असोत किंवा आजच्या पुण्यातले असोत, कायम नाकातच बोलताना का दाखवतात हे मला अजून कळलेले नाही. तर मग हे पोटशूळ वाले मंबाजी गोसावी ह्यांना पाचारण करतात वगैरे वगैरे नेहमीचे काड्यासारु धंदे चालू करतात. ह्या काळात तुकारामबुवा समाज जागृतीचे आणि सुधारणेचे कार्य करतात असे दिग्दर्शक सुचवू पाहतो. 'लांडग्यांना मारून त्यांचा शेपट्या दाखवल्यास शिवाजी राजे इनाम देतात' हे तरुणांना सांगणे आणि 'पाईक म्हणजे सैनिक. स्वराज्यासाठी लढा' असे सांगून लोकांना राजांच्या सैन्यात भरती होण्यास सांगणे म्हणजे तुकारामांचे समाज जागृतीचे कार्य होय असे जर दिग्दर्शकाला वाटत असेल तर त्याला आमचा मानाचा मुजरा. अहो तुम्हाला तुकारामच कळलेले नाहीत, तर त्यांचे कार्य काय बोडक्याचे कळणार म्हणा. मग आता हे मंबाजी गोसावी ह्यांचे आगमन झाल्यावरती तुकारामांच्या आयुष्यात उलथा पालथा होणारच. ते नक्की काय होते आणि त्यातून ते कसे बाहेर पडतात हे समजून घ्यायचे असेल तर 'तुकाराम' बघणे क्रमप्राप्त. म्हणजे बघाच असे नाही, परीक्षणानंतर हे वाक्य लिहायची सहसा पद्धत आहे म्हणून आपले लिहिले आहे झाले. जाता जाता एका प्रसंगाचा उल्लेख आणि दिग्दर्शकाचे कौतुक मात्र करायलाच हवे. 'बुडालेल्या गाथा आणि त्या वर येणे' हा तुकोबांच्या अद्भुत चरित्रातला प्रसंग कुठलेही वाद विवाद निर्माण न होण्याची काळजी घेत कुलकर्णी साहेबांनी ज्या खुबीने साकारला आहे त्याबद्दल हॅटस ऑफ. ह्या परीक्षणाच्या निमित्ताने हे बोलणे योग्य आहे का नाही माहिती नाही, पण असे वाटते की 'गाथा पुन्हा वर येणे' , ' शिवचरित्रावरील मालिकेत दादोजी, रामदास स्वामी' ही पात्रेच न दाखवणे हे योग्य आहे का ? कुठेतरी 'वाद नकोत' अशी भूमिका घेताना आपण एका विशिष्टं विचारसरणीच्या समूहासमोर मान तर तुकवत नाहीये ना ? हे देखील विचारात घेतले जाणे गरजेचे आहे. विठ्ठल विठ्ठल...

रावडी राठोड

|
रावडी राठोड ह्या चित्रपटाच्या नावातच फक्त दम आहे. हे येवढे वाक्य सांगून खरेतर चित्रपटाचे परीक्षण मांडता येईल इतका हा चित्रपट डोक्याला शॉट आहे. सध्या आपल्याकडे साऊथच्या चित्रपटांच्या रिमेकची एक लाटच आली आहे, त्यातले काही चित्रपट चांगला पैसा मिळवण्यात यशस्वी देखील झाले आहेत. ह्याच वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायचा प्रभुदेवा आणि संजय लीला भन्साळीचा प्रयत्न म्हणजे रावडी राठोड. हा चित्रपट रवी तेजा च्या गाजलेल्या विक्रमार्कूडू चा हिंदी रीमेक आहे. आपल्याकडे साऊथचे जे गाजलेले रीमेक झाले मग ते अ‍ॅक्शन असो वा कॉमेडी त्या मध्ये संगीत, अ‍ॅक्शन, कथा इ. माल मसाला भलेही साऊथ मधला उचललेला असला तरी हीरो, हिरॉईन, नाच, संवाद ह्यांना एक टिपीकल बॉलीवूड टच होता. जो आपला वाटला आणि ही भेळ लोकांनी उचलून घेतली. रावडी राठोड मध्ये मात्र फ्रेम टू फ्रेम पासून ते अक्षय कुमारच्या रंगीबेरंगी कपड्यांपर्यंत सगळीच उचलेगिरी केलेली असल्याने ती असह्य होते. रवी तेजाचा चित्रपट हा चंबळ- हैदराबाद असा फिरतो, तर अक्षयचा रावडी पटणा - मुंबई असा फिरतो. चित्रपटात अक्षयची दुहेरी भूमिका असल्याने अंमळ त्रास देखील दुहेरी सहन करावा लागतो. शिवा (अक्षयकुमार) हा एक नाना उचापत्या करत चोर्‍या करणारा मनुष्य. त्याच्या जोडीला विनोदासाठी २जी (परेश गणात्रा) हे अजून एक पात्र दिलेले आहे. ह्या शिवाचे पहिल्याच नजरेत पारो (सोनाक्षी सिन्हा) प्रेम बसते. मग तिचे देखील अगदी टिपीकल मसालापटा प्रमाणे ह्याच्यावरती भेटल्या भेटल्या प्रेम बसते. हा तिला प्रामाणिकपणे आपण चोर आहोत असे सांगतो आणि तिच्या विनंतीवरून वाईट रस्ता सोडायचे देखील कबूल करतो. अर्थात त्या आधी एक मोठा हात मारून लाईफ सेटल करायचे असे ही मित्रांची जोडी ठरवते आणि मग खर्‍या अर्थाने चित्रपटाला सुरुवात होते. मी चित्रपटाला सुरुवात होते असे म्हणतोय खरे, पण तोवर ४३ मिनिटे, असंख्य भिकार विनोदी दृश्ये आणि २ गाणी होऊन गेल्याने आपण जागे नसल्यास खरा चित्रपट सुरू झाला आहे हे देखील लक्षात येणे अवघड. मोठा हात मारण्याच्या नादात ही जोडगोळी रेल्वे स्टेशनवरून एका धनवान स्त्री ची (गुरदीप कोहली) मोठी पेटी पळवून आणतात. ह्या पेटीत एका इन्सपेक्टरच्या (यशपाल शर्मा) छोटी मुलगीच निघते आणि ती 'पापा' म्हणत अक्षयच्या गळ्यालाच मिठी मारते. आता इन्स्पेक्टर समोर ती आपलीच मुलगी आहे हे कबूल केल्याने अर्थातच तिची जबाबदारी पत्करणे अक्षयला भाग पडते. त्याच ट्रंकेत अक्षयला आपल्या सारख्याच दिसणार्‍या एका माणसाबरोबरचा त्या मुलीचा चिंकीचा फोटो पाहून त्याला धक्काच बसतो. चिंकीच्या वडलांचा शोध तो सुरू करतो आणि अचानक त्याच्यावरती हल्ले व्हायला सुरुवात होतात. गोंधळलेल्या अक्षयवरच्या अशाच एका हल्ल्याच्या वेळेस त्याला वाचवण्यासाठी इन्स्पेक्टर, ती धनवान स्त्री, एक लंगडा माणूस आणि स्वतः अक्षय सारखाच दिसणारा तो इसम असे सगळे हजर होतात आणि अक्षय अजूनच गोंधळून जातो. ह्या हल्यातून अक्षयला वाचवताना दुसरा अक्षय अर्थात ए. एस. पी. विक्रम राठोड गंभीररीत्या जखमी होतो. त्याला हॉस्पिटलात हालवले जाते आणि मग तिथेच इन्सपेक्टर शर्मा आणि ती धनवान स्त्री अर्थात इन्सपेक्टर रजीया खान ह्यांच्याकडून शिवाला विक्रम राठोडचा भूतकाळ, त्याची हुशारी, ताकद, अन्याया विरुद्धची चीड, त्याचे फेमस डॉयलॉग असे सर्व सर्व समजते. हे सगळे त्याला समजल्यावरती विक्रम राठोड समजूतदारपणे मरून जातो आणि मग त्याची जागा शिवा घेतो. आता तो आपल्या परीने विक्रम राठोडचे राहिलेले कार्य पूर्ण करायची प्रतिज्ञा करतो. तो ते कसे करतो हे पाहायचे असेल तर (पाहायचे आहेच का?) चित्रपट पाहण्या शिवाय पर्याय नाही. चित्रपटात त्रुटी बघायला गेलो तर भरपूर आहेत. मुळात चित्रपटाची सुरुवात अतिशय संथ आहे. चित्रपटाची कथा सुरू होण्या आधीच घुसडलेले काही प्रसंग वात आणतात. संगीत, नृत्य, गाणी ह्या सगळ्या पातळीवरच चित्रपट साफ झोपला आहे. अक्षय कुठल्या प्रसंगात काय चेहरा करावा हेच समजत नसल्या सारखा वावरला आहे. कधीकाळी अ‍ॅक्शन दृश्ये सुंदरतेने साकारणारा अक्षय आजकाल प्रत्येक अ‍ॅक्शन दृश्यात उगाच विनोदी चेहरे अथवा हावभाव करून जॅकी चॅन होण्याचा प्रयत्न का करतो हे एक न उलगडणारे कोडे आहे. सोनाक्षी सिन्हा ही आमच्या आवडत्या स्त्रियांपैकी एक असली, तरी ह्या चित्रपटात ती 'जादू' ज्या मख्ख चेहर्‍याचे 'कोयी मिल गया' मध्ये वावरला आहे अगदी तशी वावरली आहे. अनंत जोग ह्यांची मिनिस्टरची भूमिका तर 'सिंघम' मधून कापून इथे चिकटवल्यासारखी वाटते. बाकी कलाकार 'चित्रपटात आहेत' ह्या दोन शब्दातच त्यांचे कौतुक पूर्ण होण्यासारखे आहे. खास करून ज्या स्टंट्स साठी हे रीमेक बघितले जातात ते तर इतके बालिश घेतले आहेत, की छोटा चेतन आणि अलीबाबा हे चित्रपट त्या समोर टायटॅनिक वाटतात. एकुणात काय तर अगदीच काही टाईमपास नसेल आणि २/२.१५ तास हालती चित्रच बघण्याचा अट्टहास असेल तर मग रावडीला हजेरी लावावी. मात्र मेंदू, भावना, आशा, अपेक्षा हे जाताना घरी सोडून जावे.

जन्नत २

|
इम्रान हाश्मीचे चित्रपट चालण्याचे कारण गमतीने 'ASS' (Action, Songs, Sex) असे आम्ही कायम म्हणत आलेलो आहोत. नुकताच आलेला त्याचा जन्नत २ देखील ह्या सगळ्या अपेक्षांना पुरून उरतो. कुणाल देशमुखचे दिग्दर्शन आणि भट गँगचे प्रॉडक्शन हा चित्रपट घेऊन आले आहे. नेहमीप्रमाणेच हा चित्रपट mechanic ह्या चित्रपटावर थोडाफार बेतलेला आहे. अर्थात भट गँगची ती खासियतच आहे म्हणा. 'ब्लडमनी' चा धसका घेऊन देखील ह्या चित्रपटाला हजेरी लावली, मात्र चक्क चक्क ह्यावेळी बराच टाईमपास झाला हे मान्य करावे लागेल. अर्थात चित्रपटाला जाण्याआधी आपली मिनिटा मिनिटाला 'भेणचोद' सारखी सतत वापरली जाणारी शिवी आणि 'चुत्तड पे लाथ' सारखे डायलॉग ऐकण्याची मानसिक तयारी आहे का ह्याचा विचार करून मगच पुढे पाऊल टाकावे. सोनू दिल्ली अर्थात इम्रान हाश्मी हा एक अनधिकृत आर्म डिलिंग रॅकेट मधला छोटासा मोहरा असतो. सोनू के के सी (कुत्ती कमिनी चीज) ह्याच नावाने तो सगळीकडे ओळखला जात असतो, आणि अर्थात त्या नावाला जागणारे जीवन देखील जगत असतो. रिव्हॉल्वर, देशी कट्टे विकत आपली गुजराण तो करत असतानाच अचानक त्याच्या आयुष्यात दाखल होतो ए. सी. पी. प्रताप रघुवंशी (रणदीप हूडा). ह्या प्रतापची बायको प्रवासात दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ठार झालेली असते आणि त्याच हल्ल्यात ह्या प्रतापच्या डोक्यात शिरलेली गोळी अजूनही तिथेच अडकलेली असते म्हणे. अर्थातच 'बदले की आग' ह्या न्यायाने प्रताप ह्या अनधिकृत आर्म रॅकेटसची पाळेमुळे खणून काढण्याची जिद्दीने झपाटलेला असतो. सोनू दिल्लीला कधी धमकावून, कधी तुरुंगात पाठवून तो त्याचे जिणे हराम करून सोडतो. शेवटी हे सगळे असह्य झालेला सोनू त्याच्याशी हातमिळवणी करतो आणि पोलिसांचा खबर्‍या बनतो. पहिल्याच खबरीच्या वेळी काहीतरी घोळ होतो आणि दुसरेच पोलीस तिथे उपटतात. पळून जाण्याच्या प्रयत्नात सोनूचा डीलर मारला जातो आणि सोनूची रवानगी तुरुंगात होते. ह्या मधल्या काळात सोनू साहेब जान्हवी (इशा गुप्ता) नावच्या डॉक्टरणीच्या प्रेमात पडतात आणि एक वेगळाच ट्रॅक सुरू होतो. आता प्रताप सोनू दिल्लीला जान्हवीला सगळे सांगण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करायला लागतो आणि वरच्या लेव्हलला अर्थात सिंडिकेटमध्ये काम करून ह्या रॅकेटच्या मुख्य कर्त्याधर्त्यापर्यंत पोचवण्याची अट घालतो. जान्हवीला सोनूचे सत्य माहिती नसल्याने आणि ह्या सगळ्यातून बाहेर पडल्यावरती एक साधे जीवन जगण्याचे आमिष मिळाल्याने सोनू देखील ह्याला तयार होतो. एका सिंडिकेटच्या पार्टीत सोनू आपले गन्स मधले ज्ञान दाखवून मुख्य बॉसच्या खास माणसाला खूश करतो आणि त्याचा सिंडिकेट मध्ये प्रवेश होतो. आता खबरी आणि सिंडिकेट मधला माणूस अशा सोनूच्या दुहेरी आयुष्याला सुरुवात होते. सोनूच्या आयुष्यात लग्न करून जान्हवीचा प्रवेश होतो आणि पुन्हा एकदा सोनूचे आयुष्य वेगळे वळण घेते. जान्हवीचा बाप मंगलसींग तोमर (मनीष चौधरी) हाच ह्या रॅकेटचा मुख्य असतो आणि आता सोनू वेगळ्याच कचाट्यात सापडतो. इकडे जान्हवीचा बाप सोनू मधले गुण ओळखून त्याला आपला वारस नेमतो आणि एक नवाच खेळ सुरू होतो. सिंडिकेट मधल्या खबरी कोणीतरी बाहेर फोडतो आहे हे एव्हाने सगळ्यांच्या लक्षात आलेले असते आणि संशयाची सुई सतत सोनूकडेच वळत असते, आणि त्यातच पोलिसांच्या खबरी सिंडिकेटला पुरवणारा देखील कोणीतरी आहे हे सोनुला समजते. ह्या सगळ्याला कंटाळून सोनू आता डबलगेम खेळण्याचा निर्णय घेतो. पैसे जमा करायचे आणि सरळ जान्हवीला घेऊन देशाबाहेर पळून जायचे तो ठरवतो. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच असते. ते नक्की काय असते, सोनू पळून जाण्यात यशस्वी होतो का, प्रताप नक्की काय खेळ खेळत असतो हे सगळे समजून घ्यायचे असेल तर जन्नत २ ला हजेरी लावणे गरजेचे आहे. भट गॅंगचा चित्रपट म्हणजे डायरेक्शन, लोकेशन्स अशा चर्चा करण्यात काही अर्थच नसतो. कथेचा प्लॉट व्यवस्थित 'उचलला' आहे का नाही, आणि संगीत कितपत बरे आहे येवढेच लक्ष द्यायचे. 'प्लॉट' उचलला देखील छान गेला आहे आणि संगीत देखील सुसह्य आहे. 'तू ही मेरा खुदा.. ' सारखी गाणी गाजत असल्याने त्याचा देखील फायदा चित्रपटाला मिळतोच आहे. अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर अशा टिपीकल भूमिकांचा आता सरावच झालेला असल्याने इम्रान हाश्मी अगदी सहजपणे चित्रपटभर वावरला आहे. इशा गुप्ताला अंगप्रदर्शनाचेच काम आहे आणि तिने ते पुरेपूर सुंदर निभावले आहे. खास उल्लेख करावा लागेल तो रणदीप हूडा आणि मनीष चौधरी ह्यांचा. 'डी', 'साहब बिवी और गँगस्टर' अशा चित्रपटातून भूमिका साकारणार्‍या रणदीप हूडाने आपल्या अभिनयात कमालीचा बदल घडवला आहे. एक अभिनेता म्हणून त्याच्याकडून ह्यापुढे काही एक अपेक्षा ठेवायला नक्की हरकत नाही. मनीष चौधरीला आपण 'पावडर' सारख्या मालिकांमध्ये अतिशय सहज आणि सुंदर अभिनय करताना ह्या आधी देखील पाहिले असेलच. इथे देखील त्याने आपल्या आवाजाचा, चेहर्‍याचा सुरेख वापर करत मंगलसींगची भूमिका झकास साकारलेली आहे. टिपीकल बॉलीवूड चित्रपटाचे चाहते असाल तर जन्नत तुमची मन्नत पूर्ण करणार हे नक्की.

टायटॅनिक 4D

|


कधीतरी कुठेतरी वाचले होते किंवा ऐकले होते, असे म्हणतात की कुठल्याही चित्रपटाला यशस्वी तेव्हाच म्हणायला हवे जेव्हा प्रेक्षक त्या चित्रपटाचे एक डायमेन्शन बनून जाईल. 3D मध्ये नुकताच प्रदर्शित झालेला टायटॅनिक ह्यात अगदी तंतोतंत पास झालेला आहे. ह्या नव्या, भव्य स्वरूपाच्या आणि 3D तंत्रज्ञानात प्रदर्शित झालेल्या टायटॅनिकचे आपण बघता बघता कधी चौथे डायमेन्शन होऊन जातो हे आपल्याला देखील कळत नाही.



शितयुद्धात बुडलेल्या आपल्या दोन युद्धनौका शोधण्यासाठी खरेतर अमेरिकेने मोहीम आखली होती आणि तेव्हा योगायोगानेच जलसमाधी मिळालेल्या टायटॅनिकचा शोध लागला असे म्हणतात. चित्रपटात मात्र टायटॅनिकच्या अंतर्भागातील शोधाने चित्रपटाची सुरुवात होते. ब्रॉक लोव्हेट आणि त्याच्या टीमचा शोध चालू असतो एक अत्यंत मौल्यवान अशा रत्नहाराच्या शोधासाठी. 'हार्ट ऑफ द ओशन' असे सुंदर नाव असलेल्या त्या हाराचा शोध घेताना त्यांना रत्नहाराच्या मालकाची म्हणजेच 'कॅल हॉकली' ची तिजोरी सापडते. मोठ्या उत्साहाने ते तिजोरी बाहेर काढून फोडतात, मात्र तिजोरीत हाराच्या ऐवजी काही नोटा, खराब झालेली कागदपत्रे आणि एका नग्न स्त्री चे स्केच येवढेच सापडते. ह्या शोधाची बातमी टीव्हीवरती ऐकून रोझ डॉसन नावाची एक १०० पार करत असलेली वृद्धा ते स्केच आपलेच असल्याचा दावा करते. थोडी शंका, बरीचशी उत्सुकता अशा वातावरणात तिला शोधस्थळी आणले जाते, आणि तिने सांगितलेल्या एका जहाजाच्या अद्भुत कहाणीने चित्रपटाची खरी सुरुवात होते.





खर्‍या आणि खोट्या कथांच्या अद्भुत मिश्रणाने दिग्दर्शक जेम्स कॅमरुन ने ह्या चित्रपटाची वीण गुंफलेली आहे. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून तो आपल्याला त्यात गुंतवून ठेवतो. आणि आता 3D तंत्रज्ञानाने तर आपण त्या भव्य बोटीवरचेच एक प्रवासी बनून जातो. 'कधीही न बुडण्याचे सामर्थ्य लाभलेले पाण्यावरती तरंगते एक अद्भुत स्वप्न' असेच खरेतर ह्या भव्य दिव्य टायटॅनिक बोटीचे वर्णन करायला हवे. अमेरिकेच्या दिशेने निघालेल्या ह्या बोटीवरती रोझ (केट विन्स्लेट) ही आपली आई 'रुथ' आणि भावी अब्जाधीश नवरा 'काल' ह्यांच्या बरोबर प्रवास करत असते. रोझ आजूबाजूच्या चकचकीत आणि खोट्या दुनियेला उबलेली तर तिची आई काही करून रोझचे लवकरात लवकर लग्न व्हावे आणि आपल्यावरील कर्जे लवकर फिटावीत ह्या चिंतेत असलेली. तर प्रत्येक गोष्ट पैशात मोजणारा माजोरी कॅल त्याच्या एका वेगळ्याच दुनियेत वावरणारा. ह्याच बोटीत थर्डक्लास मधून प्रवास करत असतो तो जॅक डॉसन (लिओनार्डो डी कॅप्रिओ) हा एक धडपड्या चित्रकार. वेगवेगळे देश हिंडत चित्रकलेचा आनंद लुटणे आणि मनमौजी जगणे हा त्याचा स्वभाव. अशा विविध स्तरांच्या आणि मनोवृत्तीच्या लोकांना घेऊन टायटॅनिकचा आणि आपला प्रवास सुरू होतो.





ह्या दिखाव्याच्या आणि कसलेच निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या आयुष्याला कंटाळलेली रोझ एके रात्री बोटीवरून जीव द्यायला निघते. मात्र तिथेच असलेला जॅक तिची समजूत घालून तिला वाचवतो. तिथे जमलेल्या लोकांना आणि 'कॅल' ला रोझ आपण तोल जाऊन पडणार होतो, मात्र जॅकने आपल्याला वाचवले असे खोटेच सांगते. इथेच रोझची आणि जॅकची मैत्री जमते. अर्थात अशा खालच्या दर्जाचा माणसाशी तिची मैत्री तिच्या आईला आणि होणार्‍या नवर्‍याला पसंत नसणे हे ओघानेच आले. जॅकच्या संगतीत रोझला एका वेगळ्याच विलक्षण आयुष्याची आणि जगाची ओळख होते. एकाच बोटीवरच्या ह्या आयुष्याच्या वेगवेगळ्या रंगांना पाहून ती थक्क होते. हळूहळू दोघेही एकमेकांकडे आकर्षीत व्हायला लागतात. रोझची आई आणि नवरा ह्यातला धोका वेळीच ओळखून दोघांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी सर्व तर्‍हेचे प्रयत्न करायला सज्ज होतात.
एके रात्री जॅकने काही मॉडेल्सची ज्या प्रमाणे नग्न स्केचेस काढली आहेत तसेच एक स्केच आपले देखील काढावे अशी इच्छा रोझ व्यक्त करते आणि जॅक तसे स्केच काढतो देखील भावी नवर्‍याने दिलेला अमूल्य असा 'हार्ट ऑफ द ओशन' फक्त अंगावरती ठेवून रोझ मॉडेल म्हणून हजर होते. स्केच पूर्ण होत असतानाच त्यांच्या शोधात असलेला 'काल' चा नोकर त्यांच्या पर्यंत पोचतो आणि त्यांना तेथून पळ काढावा लागतो. मात्र जायच्या आधी रोझ तो नेकलेस आणि आपले स्केच 'काल'च्या तिजोरीत ठेवून त्याला गुडबाय करायला विसरत नाही. आता बोटीवरती रोझ आणि जॅकसाठी शोधमोहीम सुरू होते. रोझ आणि जॅक मात्र गोडाउनच्या अंधारात एकमेकांच्यात जगाला विसरून गेलेले असतात. मात्र बोटीचे लोक त्यांना शोधत तिथे देखील पोचतात. आरा दोघेही तिथून पळ काढून डेकवरती धावतात, आणि त्याचवेळी रात्रीच्या सुमारास टायटॅनिक नावाच्या ह्या भव्य स्वप्नाला एका हिमनगाची धडक बसते. ही धडक येवढी वेगवान असते की बोटीच्या बेसमेंटला प्रचंड नुकसान होऊन बोटीत वेगाने पाणी शिरण्यास सुरुवात होते.



ह्या प्रसंगाचे साक्षीदार असलेले आणि पुढे येणार्‍या संभाव्य धोक्याची जाण असलेले रोझ आणि जॅक, रोझच्या आईला आणि कॅलला सावध करण्यासाठी त्यांच्या खोलीकडे धावतात. पिसाळलेला कॅल मात्र जॅकला खोट्या चोरीच्या केसमध्ये अडकवतो आणि सुरक्षारक्षकांच्या हवाली करतो. इकडे बोटीची अवस्था क्षणा क्षणाला बिघडत चाललेली असते. जास्तीत जास्त अजून दोन तास बोट तग धरेल ह्याचा अंदाज आणि मदत मिळू शकेल अशी दुसरी बोट टायटॅनिकजवळ पोचायला कमीत कमी चार तास अशी परिस्थिती निर्माण होते आणि एका प्रेमकहाणी मागे पडून मानवी भावभावनांची आणि जीवन-मृत्यूच्या खेळाची एक वेगळीच कहाणी आकार घ्यायला सुरुवात होते. जास्तीत जास्त निम्मेच प्रवासी वाहून नेता येतील येवढ्याच लाइफबोट्स टायटॅनिकवरती असल्याने अजून एक वेगळाच कठीण प्रश्न समोर येतो. अशावेळी मुले आणि स्त्रिया ह्यांना प्राधान्य देण्यात येते. मात्र ह्या गडबडीत रोझ सगळे काही सोडून जॅकला वाचवण्यासाठी धाव घेते. ती जॅकला वाचवू शकते ?, ते दोघे ह्या संकटातून बाहेर पडतात का?, टायटॅनिक नावाचे स्वप्न कुठले वळण घेते हे सगळे अनुभवायचे असेल तर टायटॅनिकचा प्रवास करण्यावाचून पर्याय नाही.



हतप्रभ होऊन स्वतःलाच गोळी मारून घेणारा चीफ ऑफिसर, शेवटच्या क्षणापर्यंत लोकांचे धैर्य टिकवून ठेवण्यासाठी सज्ज असलेला वाद्यवृंद, निराश आणि खचलेल्या मनाने मृत्यूला सामोरा जाणारा कॅप्टन, स्वप्नभंगाच्या दु:खात मृत्यूची वाट बघत थांबलेला बोटीचा डिझायनर असे एक ना अनेक लोक आपल्याला इथे भेटतात आणि जीवनाचे वेगळेच दर्शन घडवून जातात. टायटॅनिक मधले अनेक प्रसंग आपल्या काळजावरती कोरले जातात. स्वतःचा जीव धोक्यात असताना एका लहान मुलाला वाचवायला धावणारे जॅक आणि रोझ एका बाजूला तर लाईफ बोटीत जागा मिळावी म्हणून गर्दीत चुकलेल्या मुलीला आपलीच मुलगी सांगून जागा मिळवणारा कॅल एका बाजूला. बायकांना लाईफ बोटीत बसवता बसवता स्वतःच हळूच त्या बोटीत उडी मारून बसणारा मॅनेजींग डायरेक्टर जोसेफ एका बाजूला आणि पाणी कंबरेपर्यंत आलेले असताना लोकांना लाईफ जॅकेट्स वाटत फिरणारे पोर्टर एका बाजूला.



हे आणि असे बरेच प्रसंग आपल्याला हालवून सोडतात. ह्या अशा वेगळ्या अनुभवांसाठी का होईना पण टायटॅनिक पाहणे मस्टच.

ब्लड मनी

|
लिखाणाला सुरुवात करण्याआधी मला दोन अपराधांची क्षमा मागायची आहे. ते कन्फेशन का काय म्हणतात ना ते.

१) मी ब्लडमनी हा चित्रपट पैसे खर्च करून थेटरात जाऊन बघितला.
२) आणि वर मी आता त्याचे परीक्षण देखील लिहीत आहे.



ब्लड मनी हा महेश भट्ट साहेबांचा चित्रपट, अर्थात तो कुठूनतरी ढापलेल्या प्लॉटवरून तयार केलेला असणार हे उघड होतेच. त्यातून त्याला अभिनयसम्राट कुणाल खेमू आणि जगप्रसिद्ध अभिनेत्री अम्रिता पुरी असल्याचे कळले आणि आम्ही ब्लड मनी विषयी वाचायचे देखील बंद केले. त्यातच एका मित्राकडून हा चित्रपट ब्लड डायमंडसवरून उचलल्याचे समजले. आता ब्लड डायमंड वरून उचलला आहे म्हणाल्यावरती एकदा बघायला हरकत नाही असा विचार मनात डोकावला आणि त्यातच ब्लडमनीचे पहिले पोस्टर रिलीज झाले. बघतो तर ते पोस्टर टाइम ट्रॅव्हलर्स वाइफची नक्कल. भट्ट गँग आजकाल चित्रपटच नाही तर पोस्टर्स देखील नक्कल करायला लागले आहेत, हे जीस्म २ पासून उघड झालेले आहेच. असो..



खरेतर चित्रपटगृहाबाहेर पोचल्या पोचल्या समोर एजंट विनोद आणि ब्लड मनी असे दोन पर्याय समोर आले. दोन्हीची तिकिटविक्री काही वेळाने १ तिकिटावरती २ तिकिटे आणि ४ सामोसे फ्री अशा अवस्थेत जाईल अशी होती. पण मी निग्रहाने 'एजंट विनोद' कडे काणाडोळा केला आणि ब्लड मनी कडे धाव घेतली. 'विनाशकाले विपरीत बुद्धी'. ह्या चित्रपटाचे नाव ब्लड मनी का ठेवले असावे ह्याचा उलगडा पहिल्या १० मिनिटातच झाला. दर्शकाच्या खिशातून पैसा आणि शरीरातून रक्त हे दोन्ही कमी करण्याचे कार्य हा चित्रपट करत असल्याने ह्याचे नाव ब्लड मनी.



कुणाल (कुणाल खेमू) हा एक फाटका तरुण, त्याचे आरझू (अम्रिता पुरी) वरती प्रेम असते. पण ह्याच्या फाटक्या चाळ्यांमुळे पोरीच्या घरचे लग्नाच्या विरोधात. मग दोघे पळून जाऊन लग्न करतात. लग्न झाल्याबरोबर कुणाल खेमूच्या हातावरच्या रेषा पुन्हा उजळतात आणि त्याला एकदम केपटाऊनमध्ये डायमंड एक्स्पोर्टचा बिझनेस करणार्‍या फर्म मध्ये जॉब मिळतो. त्या आधी कुणाल खेमू भारतात पिझ्झा डिलिव्हरी बॉय असतो म्हणे.



धर्मेश झवेरी (मनीष चौधरी) आणि दिनेश झवेरी ( संदीप सिकंद) हे दोन बंधू ह्या फर्मचे मालक दाखवलेले आहेत. खरेतर चित्रपटाच्या सुरुवातीलाच हा धर्मेश झवेरी कोणा एकाचा मार मार मारून, आपण किती कमीने आहोत ह्याचा पाढा वाचून खून करताना दाखवलेला असल्याने, कुणाल कुठे येऊन आदळला आहे हे चित्रपटाच्या सुरुवातीलाच कळते. त्यामुळे अंधारात आजूबाजूचे चेहरे न्याहाळण्यासाठी आपल्याला पुढे बराच वेळ मिळून जातो. आल्या आल्या ह्या कुणालला एक लक्झरी बंगला राहायला मिळतो आणि एक ताबडतोब जीवाभावाचा मित्र देखील मिळतो. कंपनीत दाखल झाल्या झाल्या हा कुणाला करोडोंची डिल जी दिनेश झवेरीला करता येत नसते ती अशी चुटकीत करतो आणि धर्मेश तिवारीच्या गळ्यातला ताईत बनून जातो. ती डिल तो इतक्या बालिशपणाने करताना दाखवलेला आहे, की हा चित्रपट कुठल्याही 'झ' दर्जाच्या चित्रपटाची देखील नक्कल असण्याची शक्यता नाही हा अजून एक धक्का आपल्याला बसतो. आता कुणाल हा गळ्यातला ताईत झालेला असल्याने ताबडतोब धर्मेश झवेरी त्याला आपल्या घरी पार्टीला बोलावतो. ह्याच पार्टीत मग दिनेश झवेरी त्याची सेक्रेटरी मिया उएदा हिला कुणालच्या मागावरती सोडतो. ही भवानी संपूर्ण चित्रपटात भडक लिपस्टिक लावणे, आखूड शब्द देखील लांब वाटेल असे कपडे वापरणे आणि जाता येता कुणालच्या अंगचटीला जाणे ह्या शिवाय काहीही काम करताना दाखवलेली नाही. आता कुणालसमोर धर्मेश तिवारी एक पैशाचे जादुई जग उभे करतो, जिथे पैसा, मान मरातब, आलिशान गाड्या, दारू आणि जोडीला ही अवदसा अशी सगळी सुखे हात जोडून उभी असतात. त्यामुळे मग केपटाऊन मध्ये आल्या आल्या फक्त एखादं दोन दिवस बोंबलत हिंडल्यानंतर कुणाल आता आरझूच्या वाटेला येणे बंदच होते. त्याच्या पार्ट्या, त्याच्या रात्र रात्र चालणार्‍या मीटिंग्ज ह्यामध्ये तो व्यस्त होऊन जातो.




आरझू ही टिपीकल बायको असल्याने तिला ह्या सगळ्याचा त्रास सुरू होतो. अधे मध्ये कुणाल तिला लाडाने 'झू' वगैरे म्हणून समजूत काढण्याचा प्रयत्न करतच असतो पण ती काय ऐकायला तयार नसते. अशातच कुणालला आपला बॉस दिनेश तिवारी हा फ्रॉड करत असल्याचे लक्षात येते आणि तो मग सगळे आपल्या बॉसच्या कानावरती घालतो. अर्थातच बॉस लगेच त्याला एक उंची हॉटेलात जेवायला नेतो आणि एक बालिश लेक्चर आणि उदाहरण देऊन आपल्या कामाशी काम ठेवायचा सल्ला देतो. कुणाल मात्र 'मला सत्य समजलेच पाहिजे' अशी भूमिका घेतो. त्यातून त्याला आपल्या धंद्यात माफियांचा देखील समावेश असल्याचे कळते आणि तो हादरतो. पण पैशाची उब मिळालेला आणि चैनीला हपापलेला कुणाल हे सत्य मान्य करूनही आपल्या कामाला लाथ मारत नाही. उलट अजून जोमाने कार्यरत होतो. पुढे एका रात्री पार्टीत तो भरपूर दारू ढोसून आणि अंमली पदार्थ खाऊन मिया उएदाशी देखील रत होतो. (येवढा एकच प्रसंग जरा थोडा फार डोळे भरून बघण्यासारखा आहे. )





मग त्याच्या प्रगतीवरती जळणारा त्याच्या बॉसचा लहान भाऊ दिनेश त्याला त्याचे आणि मियाचे फोटो दाखवून ब्लॅकमेल करतो. उद्ध्वस्त अवस्थेत पोचलेला कुणाल मग आरझू पाशी सत्य काय ते स्वतःच बोलतो. ताबडतोब आरझू उन्मळून + कोसळून पडते आणि भारतात परतण्याचा निर्णय घेते. मधल्या काळात ती कुणालचा मित्र आणि त्याच्या बायकोकडे आश्रयाला जाते. इकडे कुणालला एक डिल डन करत असताना अचानक आपला बॉस दहशतवाद्यांसाठी देखील काम करत असल्याचे कळते. खरंच सांगतो, इतका मतिमंद प्रसंग मी आयुष्यात कधी मराठी सिनेमात किंवा रामसे बंधूंच्या सिनेमात देखील पाहिलेला नाही. हा दहशतवादी सरदार एका हिर्‍यांच्या खाणी पाशी ह्या कुणालची वाट बघत बसलेला असतो, त्याच्यासाठी पाठवलेल्या पेट्यांमधून बंदुका असल्याचे कुणालला तिथे लगेच तो बॉक्स असा काड्यापेटी सारखा उघडा पडल्याने लगेच समजते. इकडे ह्या दहशतवाद्याला भेटून ५/६ मिनिटात परत येत असतानाच त्याच बंदुका घेऊन ह्या दहशतवाद्याच्या माणसांनी केपटाऊनमध्ये अनेकांची हत्या केल्याची दृश्ये टीव्ही वरती दाखवली जायला लागतात.



इमॅजीन करा, कुणाल खेमू त्याच्या प्रायव्हेट प्लेन मधून केपटाऊन मध्ये पोचण्याच्या आधीच शस्त्रे पोचतात आणि दंगल पण होते.ह्या दंगलीत कुणालचा मित्र देखील मारला जातो. कुणाल पोचेपर्यंत त्याचे दफन देखील झालेले असते. आता देशाभिमान आणि मानवनेते पेटून उठलेला कुणाला आपल्या बॉसच्या विरोधात जातो. अता तो विरोधात जातो म्हणजे नक्की काय माकडचाळे करतो ते पाहायला आणि हो ह्या चित्रपटाचा 'न भूतो न भविष्यती' असा शेवट बघायला म्हणून का होईना तुम्ही थेटरामध्ये जायलाच पाहिजे. गेला बाजार टोरेंट तरी उतरवलेच पाहिजेत.

शाळा : प्रत्येकाच्या मनातली

|


मिलिंद बोकील ह्यांच्या शाळा कादंबरीने एका वाचक वर्गाला खरेच प्रेमात पाडले होते. 'शाळा' कादंबरी म्हणजे अजूनही जीव का प्राण अशी त्यांची अवस्था असते. ह्या वर्गाला सोडून इतर देखील अनेकांनी ही कादंबरी वाचली असणार हे नक्की. बर्‍याच वाचकांनी ती पसंतीला उतरल्याचे देखील मान्य केले असणारच. ह्या अशाच नितांत सुंदर कादंबरीवरती आधारित शाळा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मिपावरती ह्याचे परीक्षण आले देखील आहे. आज ह्या चित्रपटाचे परीक्षण ब्लॉगवरती टाकणारच होतो, म्हणून लगे हाथ मिपावरती देखील टाकत आहे. एकाच विषयावरती दुसरा धागा चालू करत असल्याने आधीच क्षमस्व.

शाळा चित्रपटाची आतुरतेने वाट बघणे गेली दोन वर्षे सुरूच होते. पुणे चित्रपट फेस्टिवलला हा सगळ्यात आधी पुण्यात आला. मात्र एकाच चित्रपटाचे तिकिट मिळत नसल्याने आणि संपूर्ण सीझन तिकिटच घ्यायच्या सक्तीने तेव्हा हा चित्रपट पाहता आलाच नाही. शेवटी एकदाचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि परवा तो बघण्याच्या सुवर्णक्षण आम्हाला मिळाला. रात्री ८.३० वाजताच्या शो ला साधारण ८.१५ वाजताच पोचलो, तर चित्रपट ८.४० ला असल्याचे कळले. स्क्रीन पाशी पोचलो तर एका आई वडील त्यांची कन्या आणि लांब उभ्या असलेल्या एक काकू येवढा प्रचंड प्रेक्षकवर्ग शाळा बघायला आल्याचे लक्षात आले. ८.४० वाजेपर्यंत संख्या वाढून साधारण १०-१२ लोक दाराबाहेर प्रतीक्षा करताना दिसले. ८.४० वाजल्यानंतर देखील दरवाजे उघडेनात तेव्हा आज बहुदा कोरम अभावी शो रद्द होतो का काय अशी शंका मनात आली. शेवटी ८.४५ ला दारे उघडली आणि आम्ही आत शिरकाव केला. नेहमीप्रमाणेच आधी चुकीच्या रो मध्ये, मग हक्काच्या रो मध्ये असे करत स्थानापन्न झालो आणि तेवढ्यात चित्रपटाला सुरुवात झालीच.



"वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुद्धा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गायींच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे." शाळाचा हा ब्लुर बरेच काही सांगून जाणारा आणि बर्‍याच आठवणींचा ठेवा गवसून देणारा. १९७० च्या सुमारास एका छोट्याश्या गावात घडणारी ही एक तरल प्रेम कथा. तिला थोडीफार जोड आहे ती आणीबाणी आणि पौगंडावस्थेतल्या मुलांच्या भावभावनांच्या पार्श्वभूमीची.



सुर्‍या, फावड्या, चित्र्या आणि जोशी हे नववीत शिकणारे वर्गमित्र. ह्यातला जोश्या अर्थात मुकुंद जोशी हा आपल्या ह्या कथेचा नायक आहे. सुर्‍याच्या वडलांच्या परवानगीने त्यांच्या बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीत अभ्यासासाठी एकत्र जमणे हे ह्या पोरांचे रोजचे काम. अर्थात शाळा भरण्या आधी तिथे एकत्र जमून मग लपून छपून येणार्‍या जाणार्‍या शाळेतल्या मुलींची आणि शिक्षकांची टिंगल करणे, त्यांना आवाज देणे हे ह्यांचे मुख्य काम. ह्यातल्या सुर्‍याचे वर्गातील गुप्तेवरती प्रेम बसलेले आहे. सुर्‍याने तिला केवडा हे नाव देखील बहाल करून टाकलेले आहे. खिडकीत उभा राहून तिला जाता येता बघणे आणि उसासे टाकणे ह्या खेरीज सुर्‍या काही करू शकत नसतो. चित्र्या नेहमीच अभ्यासात आणि संशोधनात मग्न. अर्थात कादंबरीतले चित्रेचे पात्र आणि चित्रपटातील चित्रे ह्यांचा फारसा मेळ जुळत नाही. फावड्या हा सुर्‍या सारखाच अभ्यासत कच्चा. फावल्या वेळात घरचा भाजीचा गाळा सांभाळणे हे ह्याचे काम. जोशी मात्र हरहुन्नरी. अभ्यासात ठीकठाक, वेळच्या वेळी गृहपाठ करणारा, बुद्धिबळात चमक दाखवणारा आणि मुख्य म्हणजे चित्रपट ओळखण्याच्या भेंड्यांत वर्गातील समस्त मुलींना पुरून उरणारा. ह्या जोश्याची लाइन अर्थात त्याच्या मनात बसलेली असते ती वर्गातली शिरोडकर.



ह्या सर्वांचा गुरु म्हणजे चित्र्या आणि चित्र्याचा गुरु म्हणजे त्याचा नरुमाम. हे नरुमामाचे कॅरेक्टर जितेंद्र जोशीने मस्त साकारले आहे. वर्गातल्या वयाने मोठ्या आणि महेश नावाच्या पोरावरती बिनधास्त प्रेम करणार्‍या गीताला जेव्हा मुकुंदा वर्गात खूप त्रास देतो असे कळते तेव्हा नरुमामा अशा मुलीला आपण खरेतर मदत केली पाहिजे असा सल्ला मुकुंदाला देतो तो शॉट मस्तच. जोश्या आता आपल्या लाइनीचा अर्थात शिरोडकरचा पत्ता मिळवण्याच्या मागे लागतो, मग त्यासाठी तो तिच्या घराच्या आसपास राहणार्‍या मिसाळला इंग्रजी शिकवण्याचे गाजर दाखवतो. एक अगदी सहजपणे त्याच्याकडून तिचा पत्ता देखील काढून घेतो. पुढे शाळा बदललेल्या एका मित्राकडून शिरोडकरने त्याचाच क्लास लावला असल्याची बातमी कळते आणि जोश्या लगेच त्या क्लासला ऍडमिशन घेऊन मोकळा होतो. मग हमखास गल्लीतल्या गाठी भेटी सुरू होतात. त्यातून कळत नकळत फुलत जाणारी एक वेगळीच भावना चित्रपटात अतिशय छान खुलवली आहे.

जोश्याच्या भूमिकेत अंशुमन जोशी आणि शिरोडकरच्या भूमिकेत केतकी माटेगावकर अक्षरशः 'छा गये है.' चित्रपट एका निरागसतेने पुढे पुढे सरकत जातो. ही निरागसता प्रत्येक पात्राच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात देखील सतत जाणवत राहते. प्रेम म्हणजे नक्की काय आहे, आपल्या शिरोडकर आवडते म्हणजे नक्की काय होते ह्याची नीटशी जाणीव देखील नसलेला जोश्या तिला "आपण पुढे काय करायचे?" असे विचारतो तेव्हा आपल्याला खदखदून हसायला येतेच मात्र त्या शब्दांमागची निरागसता काळजाचा ठाव देखील घेते. चित्रपटाला आणीबाणीची पार्श्वभूमी देखील आहे, मात्र एक दोन ठळक प्रसंग सोडता ती कुठे फारशी जाणवत नाही. शिरोडकला बेंद्रे बाईंनी रडवल्याने पेटून उठलेला जोश्या त्यांच्या पुढच्या तासाच्या आधी फळ्यावरती 'अनुशासन पर्व' लिहितो तो प्रसंग खासच. सुजय डहाके ह्यांनी खरेतर अप्रतिम अशा तुकड्या तुकड्यांनी जोडलेल्या प्रसंगातून ही कथा मस्त फुलवत नेली आहे. जोश्याने पकडल्यावरती अक्षर ओळखत येऊ नये म्हणून शिरोडकरला डाव्या हाताने चिठ्ठी लिहिणे, फावड्याच्या भाजीच्या गाळ्यावरती समोर एकदम शिरोडकरला आपल्याशी बोलताना पाहून जोश्याची उडालेली भंबेरी, काँन्व्हेंट मधून थेट ह्या मराठी शाळेत आलेली आणि बिनधास्त मुलांशी बोलणारी आंबेकर सुर्‍याकडे लाँड्रीवाल्या मुलाची तक्रार करते, सुर्‍या केवड्याला 'आपल्याला लाईन देते का?' असे विचारतो असे काही प्रसंग छान चितारलेले आहेत.



'कोवळ्या वयातील प्रेमकथा' ह्या टॅग लाइन खाली आपण आजकाल अनेक अत्याचार सहन केले आहेत. मात्र शाळा ह्याला नक्की अपवाद आहे. केतकी माटेगावकरने उभी केलेली शिरोडकर ही अक्षरशः कादंबरीतूनच बाहेर आल्यासारखी वाटते. तिचे दिसणे तर मोहक आहेच पण अभिनय आणि कॅमेर्‍याची जाण देखील अतिशय सुरेख. कोवळ्या वयात जाणवणार्‍या भावना, एखाद्या मुलाशी घराजवळ उभे राहून बोलताना होणारी कुचंबणा, भिती तिने अतिशय सहजपणे अभिनयातून साकार केली आहे. जोश्याने 'भेटणार का?' विचारल्यावरती तिचे 'छे बॉ. आपल्याला नाही जमायचे तसले काही' म्हणणे तर एकदम कलिजा खलास करणारे. अंशुमन जोशीने देखील अतिशय उत्तम आणि समंजस अभिनयाने आपल्या कॅरेक्टर मध्ये रंग भरले आहेत. केवड्याच्या वडलांच्या भूमिकेत आनंद इंगळे, मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर छोट्या प्रसंगातही आपली छाप सोडून जातात. इतिहास भूगोल ह्यावरती अतिशय प्रेम करणारे आणि इतर विषयांना तुच्छ समजणारे मांजरेकर सर संतोष जुवेकरनी अप्रतिम साकारले आहेत.

कादंबरी जशीच्या तशी पडद्यावर उतरली असेल अशा समजुतीने जाल तर हा चित्रपट तुमची नक्कीच निराशा करेल. अर्थात कादंबरी मुख्य कथानकासह पडद्यावर आणण्याच्या सुजय डहाके ह्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे हे नक्की. शाळा न वाचलेल्यांनी तर ती वाचल्याशिवाय ह्या चित्रपटाला जाऊच नये, अन्यथा काही प्रसंग डोक्यावरून जाणार हे निश्चित. चित्रपटात काही उणीवा देखील निश्चित राहिल्या आहेत. वैभव मांगले, अमृता खानवीलकर ह्यांच्या भूमिकांची इतकी काटछाट झालेली आहे, की त्या भूमिकांना काही आगा पिछाच राहिलेला नाही. त्यामुळे त्या मनावरती ठसत नाहीत आणि उगाच घुसडल्यासारख्या वाटतात. आणीबाणी आणि तिच्याशी निगडित काही प्रसंगांचा कादंबरीत इतका सुरेख उपयोग करून घेतलेला असताना चित्रपटात मात्र त्याची उणीव जाणवते. जोश्या आणि शिरोडकर ह्यांच्यातले प्रसंग चित्रपटात छानच फुलवले आहेत, मात्र अधे मध्ये ते उरकून टाकल्यासारखे वाटतात. शिरोडकरचे घर कळल्यावरती जोश्याने तिथे चालू केलेल्या फेर्‍या, तिच्या गल्लीच्या कोपर्‍यावरील सार्वजनीक वाचनालयाचा वाढत्या फेर्‍या हे सगळे चित्रपटात अजिबात दाखवलेले नाही. जोश्याचे वर्गातल्या मुलींना चिमण्या म्हणणे, चित्र्याचे संशोधक प्रयोग, त्याच्या घरच्या परिस्थितीने त्याचे कोवळ्या वयात होणारे हाल, फावड्याची परिस्थिती हे देखील कुठेच समोर येत नाही. त्यामुळे सुर्‍या, फावड्या, चित्र्या ही पात्रे काहीशी दुर्लक्षित आणि विनोद निर्मिती पुरतीच उरून बसतात.



अर्थात उणीवा बाजूला सरून एकदा तरी हा चित्रपट अनुभवावा हे निश्चित. जाता जाता दखल घेण्याजोगे म्हणजे चित्रपटासाठी केलेली गावाची निवड आणि गावाचे घडणारे रम्य दर्शन गणपतीचे देऊळ, नदीचा काठ.. सगळेच अप्रतिम. निव्वळ ह्यासाठी ह्या चित्रपटाला मी ४ गुण नक्की देईन.